Davis Cup 2024 : सुमित नागलचे डेव्हिस चषक संघात पुनरागमन तर युकी भांबरीची माघार….

Sumit Nagal returns to Davis Cup team : भारताचा अव्वल एकेरी खेळाडू सुमित नागलने स्वीडनविरुद्धच्या जागतिक गट एक सामन्यासाठी डेव्हिस कप संघात पुनरागमन केले आहे. हा सामना 14-15 सप्टेंबरला स्टॉकहोममध्ये होणार आहे. मात्र, युकी भांबरीने या महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतल्याने संघात काही बदल पाहायला मिळतील.
फॉर्मात असलेला सुमित नागल संघाचे नेतृत्व करेल. यापूर्वी नागल पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच वेळी, शशिकुमार मुकुंद इस्लामाबादमध्ये झालेल्या त्या सामन्यात सहभागी होऊ शकला नव्हता आणि या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे त्याला दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. याच कारणामुळे यावेळीही मुकुंदला संघात स्थान मिळाले नाही.
‘या’ खेळाडूंना मिळाली संधी ..
सुमित नागल व्यतिरिक्त डेव्हिस कप संघात रामकुमार रामनाथन, एन श्रीराम बालाजी, निक्की पूनाचा आणि माजी राष्ट्रीय विजेता सिद्धार्थ विश्वकर्मा यांचाही समावेश आहे. आर्यन शाहची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. रोहन बोपण्णाच्या निवृत्तीनंतर दुहेरीत भारताचा नंबर वन खेळाडू असलेल्या युकी भांब्रीने या सामन्यामधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
निवड समितीचे अध्यक्ष नंदन बाल यांनी सांगितले की, युकीने त्याच्या अनुपलब्धतेचे कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र, एआयटीए (ऑल इंडिया टेनिस असोसिएशन) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्याची निवड न झाल्याने युकी खूश नव्हता. त्याच्याऐवजी रोहनने दुहेरीत जोडीदार म्हणून बालाजीची निवड केली होती. तसेच असेही सांगण्यात आले की, “बालाजीसोबत खेळण्याचा निर्णय रोहनचा होता. एआयटीएने त्या निर्णयाचे समर्थन केले. तो टॉप-10 खेळाडूंपैकी एक होता आणि त्याला त्याचा जोडीदार निवडण्याचा विशेषाधिकार होता आणि यासाठी एआयटीएला दोष देता येणार नाही.”
रोहित राजपाल असेल कर्णधार…
संघाचा कर्णधार रोहित राजपालही परतणार आहे, जो वैयक्तिक कारणांमुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. एआयटीएने असेही स्पष्ट केले की, ते वेगवेगळ्या संयोजनांचा प्रयत्न करतील आणि कोणत्या संयोजनाने संघ अधिक चांगली कामगिरी करू शकेल हे पाहतील.
Vinesh Phogat : विनेश फोगटने निवृत्तीबाबत घेतला यू-टर्न? म्हणाली ‘माझ्यात अजूनही…’
आशुतोष सिंग नवे प्रशिक्षक…
झीशान अली यांनी डेव्हिस कप प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी राष्ट्रीय चॅम्पियन आशुतोष सिंग यांची राष्ट्रीय संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एआयटीएकडे दिल्लीचे खेळाडू आशुतोष सिंग आणि एम बालचंद्रन यांच्या रूपाने दोन पर्याय होते, मात्र खेळाडूंचे मत लक्षात घेऊन आशुतोष सिंग यांची प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. तब्बल 11 वर्षांनंतर संघाला नवीन प्रशिक्षक मिळाले आहेत.





