Davis Cup 2024 : भारतीय टेनिस संघाची हाराकिरीची मालिका कायम, स्वीडनचा 4-0 ने एकतर्फी विजय…

Davis Cup 2024 (India vs Sweden) : डेव्हिस कपमध्ये स्वीडनविरुद्ध भारतीय टेनिस संघाची निराशाजनक कामगिरी व पराभवाची मालिका यंदाही कायम राहिली. स्वीडनच्या संघानं मायदेशात पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील जागतिक गट एकमधील लढतीत भारतावर 4-0 असा शानदार विजय साकारला. यासह भारताला स्वीडनकडून सहाव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यजमान देशाने कमकुवत संघ मैदानात उतरवल्यामुळे स्वीडनला पराभूत करण्याची भारतासाठी ही सर्वोत्तम संधी होती. मात्र, याचा फायदा भारतीय संघाला घेता आला नाही. आता भारतीय टेनिस संघाला पुढल्या वर्षी जागतिक गटातील (एक) स्थान कायम राखण्यासाठी प्ले-ऑफ लढतीमध्ये खेळावे लागणार आहे.
पहिल्याच दिवशी 2-0 ने पिछाडीवर…
भारत-स्वीडन यांच्यामधील लढतीला शनिवारी सुरुवात झाली. स्टॉकहोमच्या रॉयल टेनिस हॉलच्या इनडोअर हार्ड कोर्टवर खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत स्वीडनचा अव्वल मानांकित टेनिसपटू इलियास वायमेर याने एन. श्रीराम बालाजी याला 6-4,6-2 असे पराभूत करत स्वीडनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. देशाचा अव्वल एकेरी खेळाडू सुमित नागल याने पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने भारताला बालाजीला एकेरीत उतरवणे भाग पडले.
पहिल्या दिवशी भारताला एक गुण मिळवून देण्याची जबाबदारी रामकुमारवर होती. त्याने 21 वर्षीय बोर्गविरुद्ध एकेरीचा सामना जिंकायला हवा होता पण त्याला स्वीडन खेळाडूचे आव्हान पार करता आले नाही आणि त्याचे आव्हान अवघ्या 58 मिनिटांत संपुष्टात आले. लिओ बोर्ग याने दुसऱ्या लढतीत रामकुमार रामनाथन वर 6-3, 6-4 असा विजय मिळवला. यासह स्वीडनच्या संघानं भारतीय टेनिस संघावर पहिल्याच दिवशी 2-0 अशी आघाडी घेतली होती.
दुहेरीतही निराशाजनक कामगिरी….
भारताला डेव्हिस कपमध्ये जागतिक गट (एक) यामधील आव्हान कायम राखण्यासाठी रविवारी तिसरी म्हणजेच दुहेरीतील लढत जिंकणे महत्त्वाचे होते, पण रामकुमार रामनाथन व एन. श्रीराम बालाजी या जोडीला प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करता आले नाही. एक तास 19 मिनिटे चाललेल्या या तिसऱ्या लढतीत रामकुमार आणि बालाजी यांना आंद्रे गोरानसन आणि फिलिप बर्गेवी यांच्याकडून 3-6, 4-6 असा पराभव पत्करावा लागला.
Asian Champions Trophy 2024 : उपांत्य फेरीत पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, चीननं उडवला धुव्वा…
सिद्धार्थही ठरला अपयशी…
यानंतर, एकेरीचे सामने औपचारिक राहिले होते पण कर्णधार रोहित राजपालने चौथ्या लढतीत माजी राष्ट्रीय चॅम्पियन सिद्धार्थला आजमावण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी डेव्हिस कपमध्ये पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थला कोणतीही जादू दाखवता आली नाही आणि इलियास यामेरकडून 2-6, 2-6 असा पराभव पत्करावा लागला. यानंतर दोन देशांमधील पाचवी व अखेरची एकेरीची लढत खेळवण्यात आली नाही. यासह भारताला 4-0 ने पराभवला सामोरं जावं लागलं.





