Weatherald Unique Fielding : “मी आयुष्यात असं कधीच पाहिलं नाही!”; शॉर्ट लेगवर वेदरॉल्डने नेमके काय केले? वॉर्नरही चक्रावला
Weatherald Unique Fielding : मैदानात शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या जेक वेदरॉल्डच्या एका अजब क्षेत्ररक्षण तंत्राने सर्वांचे लक्ष वेधले.

David Warner Reacts To Jake Weatherald Unique Short Leg Fielding AUS vs BAN Darwin Test : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. अवघा दुसरा कसोटी सामना खेळणारा २५ वर्षीय सलामीवीर तंजिद हसनने (Tanzid Hasan) शानदार शतकी खेळी करत बांगलादेशला दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३५१ धावांपर्यंत पोहोचवले. बांगलादेशने १५३ धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज हतबल दिसले. कांगारूंच्या ८ गोलंदाजांना बांगलादेशी फलंदाजांनी दमवले असतानाच, मैदानात शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या जेक वेदरॉल्डच्या (Jake Weatherald) एकाअजब क्षेत्ररक्षण तंत्राने (Fielding Technique) सर्वांचे लक्ष वेधले.
शॉर्ट लेगवरील अजब हालचाल पाहून डेव्हिड वॉर्नर थक्क –
ऑफ-स्पिनर नॅथन लायन गोलंदाजी करत असताना शॉर्ट लेगवर उभा असलेला जेक वेदरॉल्ड गोलंदाजाच्या रन-अपसोबत स्वतःही एक-दोन पावले पुढे चालत जाऊन नंतर झुकलेल्या (Crouch) पोझिशनमध्ये येत होता. ‘फॉक्स क्रिकेट’वर समालोचन करत असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) हे दृश्य पाहून थक्क झाला. वॉर्नर म्हणाला, “तो गोलंदाजासोबत स्वतःही पुढे चालत येत आहे! मी माझ्या संपूर्ण आयुष्यात शॉर्ट लेगवर अशी हालचाल करताना कोणालाही पाहिलेले नाही. फलंदाजापासून केवळ एक मीटर अंतरावर उभे असताना असे चालणे खूपच विचित्र आणि वेगळे आहे.”
“मला आळस येतो म्हणून…”; वेदरॉल्डने उलगडले गुपित –
View this post on Instagram
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर डेव्हिड वॉर्नर, ॲडम गिलख्रिस्ट आणि ॲलिसा हिली यांनी वेदरॉल्डला या अनोख्या तंत्राबद्दल विचारले असता त्याने हसतमुखपणे एक मजेशीर खुलासा केला. वेदरॉल्ड म्हणाला की, शॉर्ट लेगसारख्या धोकादायक जागेवर शांत उभे राहिल्यास त्याला आळस येऊ लागतो; त्यामुळे स्वतःला ॲक्टिव्ह आणि अलर्ट ठेवण्यासाठी तो अशी हालचाल करतो. इतकेच नव्हे तर फलंदाजी करताना स्वतःचे मनोबल वाढवण्यासाठी तो गोलंदाजाच्या रन-अपवेळी स्वतःशीच बोलतो आणि प्रसंगी स्वतःला शिवीही देतो, असा रंजक खुलासा त्याने केला.
बांगलादेशकडून ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर –
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन कर्णधाराला बांगलादेशच्या फलंदाजांना रोखण्यासाठी तब्बल ८ वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर करावा लागला, तरीही त्यांना यश आले नाही. पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया अवघ्या १९८ धावांत गारद झाली होती, तर बांगलादेशने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १५३ धावांची आघाडी घेत ऑस्ट्रेलियन संघाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले आहे.





