भाग – 3
नारायण पेठेत केळकर रस्त्यावरून लोखंडे तालीमकडे जाणाऱ्या रस्त्यावर “उभा सिद्धीविनायका’चे मंदिर आहे. “633 नारायणपेठ’ असा या मंदिराचा पत्ता आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे. याच्यात मुकुट कोरलेला आहे.
हात सोडलेले असून ते गुडघ्याच्या खाली आहेत, वरच्या हातात शस्त्र असून ते अस्पष्ट आहेत. ही मूर्ती अजानुबाहू आहे. याची सोंड उजव्या बाजूला असून वेटोळा घातलेला आहे. उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात गोलाकार पदार्थ असल्याचे दिसते.
ही मूर्ती दगडी, शेंदूरलिप्त आणि उग्रस्वरूप आहे. या मूर्तीची उंची साडेतीन ते चार फूट आहे. मूर्तीसमोर समाधी असून ती कोणाची आहे, हे सांगता येणार नाही. सुमारे 50 वर्षांपूर्वी या मंदिरात दत्त आणि विठ्ठलाच्या मूर्ती होत्या.
या मंदिराचा जिर्णोद्धार करताना त्या विसर्जित करून केवळ गणेशाचीच मूर्ती येथे ठेवण्यात आली. हे मंदिर सणस कुटुंबीयांच्या मालकीचे आहे. त्यामुळे त्याचे दर्शन घेण्याला सर्वसामान्यांना खुले नाही.