लखनऊ – उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ दरभंगा-इटावा एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत 3 डब्ब्यांना भीषण आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेलं नाही. आगीचे व्हिडीओ समोर आले आहे. ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. ही दुर्घटना बुधवारी (दि. 15) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
इटावा येथून ही गाडी नवी दिल्लीसाठी रवाना झाली होती. या आगीत जनरल डब्बा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. प्रवाशांनी ट्रेनखाली उड्या मारुन आपला जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, सराय भूपत स्टेशनला ट्रेन जात असताना स्टेशन मास्तरला स्लिपर कोचमध्ये धूर पाहिला होता. स्टेशन मास्तरने वॉकी टॉकीच्या मदतीने ट्रेन ड्रायव्हर आणि गार्डला सूचना केली होती. त्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली आणि पावर ऑफ केलं गेलं. यानंतर स्लिपर कोचमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.