पुणे – एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या गुरुवारी होत असलेल्या सामन्यासाठी दाखल झालेल्या भारतीय संघातील खेळाडूंनी सोमवारी विश्रांती घेणेच पसंत केले. मात्र, मंगळवारी प्रकाशझोतात सर्व खेळाडूंनी कसून सराव केला. याचवेळी अन्य सराव खेळपट्ट्यांवर बांगलादेश संघानेही सराव केला. भारतीय संघ पुण्यात दाखल झाल्यावर संघासह सपोर्ट स्टाफही दाखल झाला होता. मात्र, वैयक्तिक कारणाने नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली तातडीने मुंबईला रवाना झाले होते. ते देखील मंगळवारी सकाळी येथे परतले. यंदाच्या स्पर्धेत यजमान भारतीय संघालाच संभाव्य विजेता मानले जात असले तरीही त्यांचा प्रवास सोपा नसेल. त्यांनी पहिले तीनही सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. राउंड रॉबीन पद्धतीने ही स्पर्धा होत असल्यामुळे प्रत्येक संघाला प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे. आता भारताचे तीन सामने सोपे वाटत आहेत, तर तीन सामने कठीण वाटत आहेत. भारताचे तीन विजयांसह 6 गुण झाले असून त्यांचा नेट रनरेट (अधीक 1.821) आहे. या श्रेणीतील पहिले चार संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवणार आहेत. भारतासह न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान हे अन्य संघ पहिल्या चार क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाही चकित करू शकते सोमवारी ऑस्ट्रेलियाने आपला पहिला सामना जिंकत विजयाचा मार्ग धरला असल्याने ते देखील पहिल्या चारमध्ये प्रवेश करू शकतात. त्यांनी सलग दोन पराभव स्वीकारल्यानंतर श्रीलंकेचा पराभव करत गुणांचे खाते उघडले आहे. अर्थात त्यांना पुढील किमान पाच सामने जिंकावे लागतील तरच त्यांना उपांत्य फेरीची आशा आहे. भारतीय संघाला मोठी संधी भारताला आणखी सहा सामने खेळायचे आहेत. ते सर्व सामने जिंकले तर थेट उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल. तसेच न्यूझीलंड, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांनी पुढील लढतींमध्ये आणखी एक पराभव पत्करला व दुसरीकडे भारताला पुढील सहापैकी दोन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला तरीही त्यांची उपांत्य फेरीची संधी कायम राहणार आहे. भारताचे पुढील सामने – विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर, पुणे – विरुद्ध न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर, धर्मशाला – विरुद्ध इंग्लंड, 29 ऑक्टोबर, लखनौ – विरुद्ध श्रीलंका, 2 नोव्हेंबर, मुंबई – विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, कोलकाता – विरुद्ध नेदरलॅंड्स, 12 नोव्हेंबर, बंगळुरू