Kundamala: कुंडमळ्यात पावसाळी पर्यटनासाठी गर्दी! धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन
Kundamala: शेवाळलेले खडक आणि नदीचा वेगवान प्रवाह यामुळे अपघाताची भीती; छायाचित्रे काढण्याच्या नादात पाण्यात उतरणे बेतू शकते जीवावर.

Kundamala – मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. इंद्रायणी नदीच्या पात्रातील नैसर्गिक कुंड, खडक आणि हिरवागार परिसर पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येथे येत असले, तरी धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरण्याचा मोह अनेकांच्या जीवावर बेतू शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. बेगडेवाडीजवळील कुंडमळा परिसरात पावसाळ्यात नदीचा प्रवाह वेगवान होतो.
फेसाळणाऱ्या पाण्यामुळे नदीतील खोल खड्डे आणि खडकांचा अंदाज येत नाही. शिवाय खडकांवर शेवाळ साचल्याने परिसर अत्यंत निसरडा बनतो. असे असतानाही अनेक पर्यटक धोक्याची पर्वा न करता पाण्यात उतरून छायाचित्रे काढणे आणि वर्षाविहाराचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी झालेल्या पुल दुर्घटनेला वर्षाहून अधिक कालावधी लोटला असला, तरी नवीन पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
त्यामुळे पर्यटकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही अतिउत्साह आणि निष्काळजीपणामुळे या परिसरात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. पुणे-मुंबईसह विविध भागांतून शनिवार-रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक कुंडमळ्यात दाखल होत असल्याने पोलीस प्रशासनानेही खबरदारीच्या उपाययोजना वाढवल्या आहेत.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी पर्यटकांना विनाकारण नदीच्या प्रवाहात उतरू नये, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे तसेच परिसरात लावलेल्या सूचना फलकांवरील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित पर्यटनाचा आनंद घ्यावा, असेही त्यांनी म्हंटले आहे.





