Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडेत नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता दुभंगला, नेमकं कारण आलं समोर
Talegaon Dabhade: नुकतेच डांबरीकरण झालेला रस्ता पाण्याच्या दाबाने उखडला; पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने व्हॉल्व बंद करून पुढील अनर्थ टळला.

Talegaon Dabhade – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत संभाजीनगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीच्या आउटलेट पाईपलाईनची तांत्रिक चाचणी सुरू असताना पाण्याचा दाब वाढल्याने बाजारपेठेतील जमिनीखालील मुख्य पाईपलाईनमधून पाणी वर आले आणि रस्त्याचा काही भाग दुभंगला. नुकतेच डांबरीकरण झालेल्या रस्त्याला तडे गेल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात विविध पाण्याच्या टाक्या,
मुख्य दाबनलिका आणि वितरण नलिका टाकण्याचे काम पूर्ण झाले, त्याचाच भाग म्हणून संभाजीनगर येथील पाण्याच्या टाकीच्या आउटलेट लाईनची नियोजित तांत्रिक चाचणी शनिवारी घेण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, तांत्रिक कर्मचारी, संबंधित कंत्राटदार तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सुमारे दीड वर्षांपूर्वी ही मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली होती. संबंधित रस्ता शहरातील मुख्य बाजारपेठेतील असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अंतिम चाचणीपूर्वी त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.
तसेच चाचणीदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती. टाकीतून पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब वाढल्यामुळे जमिनीखालून पाणी बाहेर येऊन रस्त्याला तडे गेल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच तांत्रिक पथकाने तत्काळ मुख्य व्हॉल्व बंद करून पाण्याचा प्रवाह थांबविला, अशी माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख अभिषेक शिंदे यांनी दिली.
घटनेनंतर संबंधित परिसर तातडीने सुरक्षित करून पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी आवश्यक मोजमाप घेण्यात आले आहे. उर्वरित दुरुस्तीचे काम मंगळवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित कंत्राटदारामार्फत रस्ता आणि परिसर पूर्ववत केला जाईल
– गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी





