Pune District : नळवणे गावात पिके करपली; चार्याचा प्रश्न गंभीर
Pune District : खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकर्यांनी आशेने सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली.

बेल्हे : पावसाने तब्बल दोन-अडीच महिन्यांपासून दिलेल्या दीर्घ उघडीपेमुळे नळवणे (ता. जुन्नर) परिसरातील शेती संकटात सापडली आहे. शेतकर्यांचे प्रमुख पीक असलेले सोयाबीन पावसाअभावी करपून गेले असून उत्पादनाची अपेक्षा मावळली आहे. त्यातच जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांसमोरही गंभीर संकट निर्माण झाले आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकर्यांनी आशेने सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली. सध्या अनेक शेतांमध्ये सोयाबीनची पिके सुकून करपली असून अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या शेती खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. पावसाअभावी शेतातील हिरवा चारा नष्ट झाल्याने जनावरांच्या चार्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
पशुपालकांना बाहेरून चारा खरेदी करावा लागत असल्याने त्यांच्या खर्चात आणखी भर पडत आहे. शेतीपाठोपाठ पशुधन वाचविण्याचे आव्हानही शेतकर्यांसमोर उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर माजी सरपंच तुषार देशमुख व सामाजिक कार्यकर्ते संतोष रामनाथ शिंदे यांनी शासनाचे लक्ष नळवणे परिसरातील परिस्थितीकडे वेधले आहे. नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि पात्र शेतकर्यांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच नळवणे परिसरातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत
पिकांचे नुकसान, जनावरांच्या चार्याची टंचाई आणि वाढता शेती खर्च यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी, पंचनामे, चारा उपलब्धता आणि शासनाच्या मदतीबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.





