Warje Malwadi Firing : वारजे माळवाडीत गोळीबार! पोलिसांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला; मुख्य आरोपी जेरबंद
Warje Malwadi Firing : पोलीस आयुक्तांच्या 'फूट पेट्रोलिंग'चा मोठा परिणाम; गोळीबाराच्या घटनेत तत्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद.

Warje Malwadi Firing – वारजे माळवाडीत शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेत पोलिसांनी धाडस दाखवत मुख्य आरोपीला जेरबंद केले. गस्तीदरम्यान अचानक सुरू झालेल्या गोळीबारामध्ये दोन नागरिक जखमी झाले असून, पोलिसांच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार वारजे माळवाडी पोलीस ठाणे हद्दीत दररोज पायी गस्त सुरू आहे.
२४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता पोलीस अंमलदार गस्त घालत असताना यशोदीप चौक परिसरात हेअर ॲडिक्ट सलूनसमोर काही तरुणांचा गोंधळ सुरू होता. यावेळी एक तरुण थेट पिस्तूलमधून गोळीबार करत असल्याचे दिसताच पोलीस अंमलदार अमित शेलार आणि निखील तांगडे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता त्यांनी साहिल धनंजय राऊत ( २१) याला चतुराईने पकडून गोळीबार थांबवला.
पोलिसांना पाहताच इतर साथीदारांनी तेथून पळ काढला. या गोळीबारात दोनजण जखमी झाले असून, एका व्यक्तीच्या कानाजवळ तर दुसऱ्याच्या पायाला गोळी लागली. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी उषा रविंद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपी आणि दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. फरारींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत.





