Crime News : शिरूरमध्ये खळबळ…! भल्या पहाटे अमोल ज्वेलर्सवर दरोडा; तब्बल १ कोटी ३८ लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास

शिरूर : शहरातील गजबजलेल्या सरदारपेठ परिसरात पहाटेच्या सुमारास अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रा. लि. या प्रतिष्ठित सराफ दुकानावर दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी चोरी केली. चार ते पाच जणांच्या टोळीने अत्याधुनिक कटर व साधनांचा वापर करून दुकानाचे शटर, सुरक्षा ग्रील व काउंटरची काच फोडून तब्बल १ कोटी ३८ लाख ४० हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेला आले.
यामुळे शहरात मोठी खळबळ मारली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना दि. २४ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजेपासून साडेचार वाजेदरम्यान घडली. चोरट्यांनी सुरुवातीला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे वाकडे केले, वायरी तोडल्या व काही कॅमेरे पूर्णपणे नष्ट केले. त्यानंतर दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत त्यांनी ७० किलो चांदीचा ऐवज (पैंजन, तोडे, वाळे, चैन, हत्तीमोरा) किंमत ६.३० लाख,चांदीचे जोडवे ७ किलो किंमत ७ लाख,सोन्याचे कर्णफुले, अंगठ्या, चैन व अन्य दागिने ४६ ग्रॅम किंमत ४.१४ लाख, सोन्याचे गंठण, राणीहार, टेंपलहार, अंगठ्या आदी ७१४ ग्रॅम किंमत ६४.२६ लाख असा एकूण १ कोटी ३८ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांना चोरीची चाहूल लागताच दुकानदार वैभव पुरुषोत्तम जोशी यांना फोन करून माहिती देण्यात आली. स्वतः समोरच राहणाऱ्या जोशी यांनी गॅलरीतून ही घटना पाहिली व आरडाओरडा केला. त्यामुळे घाबरून चोरट्यांनी चारचाकी गाडीत बसून पळ काढला. ही संपूर्ण घटना दुकान व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदेश केंजळे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पुणे ग्रामीण गुन्हे शाखा, रांजणगाव पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक लॅबचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिर्के यांनीही तपासात सहभाग घेतला. या धाडसी दरोड्यामुळे शहरातील व्यापारी वर्ग व नागरिकांमध्ये ऐन नवरात्र, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या पार्श्वभुमीवर प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





