Crime News: दहशत, खंडणी अन् खुनाचा प्रयत्न… शिक्रापूरातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध
Crime News: सराईत गुन्हेगार अकोला कारागृहात

शिक्रापूर : तालुका शिरूर परिसरात वारंवार गंभीर गुन्हे करून दहशत माजवणाऱ्या सुरज उर्फ मोन्या संजय देंडगे (वय २७, रा. चाकण रोड, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) या सराईत गुन्हेगारावर एका वर्षासाठी स्थानबद्धतेची कडक कारवाई केली आहे. शिक्रापूर पोलिसांच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली असून आरोपीला तातडीने अकोला मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
गुन्ह्यांची मोठी पार्श्वभूमी
सुरज उर्फ मोन्या देंडगे याच्यावर शिक्रापूर व परिसरात दहशत माजवणे, हत्यारांचा धाक दाखवणे, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे आणि मारहाण करणे यांसारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी यापूर्वी त्याला अनेक गुन्ह्यांमध्ये अटक करून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या होत्या. मात्र, तो पुन्हा गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होत होता.
एका वर्षाच्या कालावधीसाठी स्थानबद्ध
सराईत आरोपीच्या वाढत्या कारवाया लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सुरज उर्फ मोन्या देंडगे याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याबाबतचा विशेष अहवाल तयार केला.
हा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. अहवालाची सखोल पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुरज उर्फ मोन्या देंडगे याला एका वर्षाच्या कालावधीसाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
पोलिसांची तातडीची कारवाई
आदेश प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जितेंद्र पानसरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, पोलीस हवालदार रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, अमोल नलगे आणि नारायण वाळके यांच्या पथकाने तातडीने हालचाली करत मोन्या देंडगे याला ताब्यात घेतले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला अकोला कारागृहात रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.
हेही वाचा :
Snake Bite: साप चावल्यानंतर रुग्णाला जागं का ठेवतात? जाणून घ्या डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला




