Pune : 10 वर्षांचा न्यायालयीन वाद संपला; दोन जिवलग मित्र पुन्हा एकत्र, वकिलांच्या पुढाकाराने ‘तडजोड’
Pune : पैशांच्या व्यवहारातून दोन जिवलग मित्रांमध्ये सुरू असलेला दहा वर्षांचा न्यायालयीन वाद अडीच लाखांच्या तडजोडीने संपला. वकिलांच्या पुढाकाराने मैत्रीही पुन्हा जुळली.

Pune : असे म्हणतात की, पैसा हा भल्याभल्यांमध्ये वितृष्ट आणत असतो. असेच दोन जिवलग मित्रांमध्ये हातऊसणे घेतलेल्या पैशावरून निर्माण झालेला वाद तब्बल १० वर्षांनी मिटला आहे. ऊसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश अनादरीत झालेले प्रकरण दोघांच्या वकिलांच्या पुढाकाराने मिटले.
४ लाख ८५ रुपयांवरून सुरू असलेला वाद अडीच लाख रुपयांच्या तडजोडीने मिटला. अन मैत्रित आलेला १० वर्षांचा दुरावा संपूण दोघांना एकामेकांना अलिंगन दिले. यावेळी दोघांच्या डोळ्यात अश्र आले. फिर्यादीचे वकील परीक्षित बडे आरोपींचे वकील सुधीर मुळे यांच्या पुढकाराने या दाव्यात तडजोड झाली.
सोनू आणि मोनू (नावे बदलली आहेत) दोघे वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे दोघांची ९ ते १० वर्षांपासून घट्ट मैत्री होती. मोनू याचे गॅरेज देखील होते. व्यवसायाच्या अडचणीतून मोनूने सोनूकडे पैसे मागितले. त्यानुसार सोनूने जून आणि जुलै २०१५ मध्ये ४ लाख ८५ हजार रुपये बॅंकेतून काढून केवळ विश्वासापोटी हातऊसने दिले.
२ ते ३ महिन्यात ही रक्कम परत देण्याचे मोनूने मान्य केले होते. मात्र, पैसे दिलेच नाहीत. त्यामुळे सोनूने पैशाची मागणी केली. त्यानुसार मोनूने जानेवारी २०१६ मध्ये राष्ट्रीयकृत बॅंकेचा ४ लाख ८५ हजाराचा धनादेश दिला. हा धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याच्या कारणावरून अनादरीत झाला. त्यामुळे १६ मार्च २०१६ पासून दोघात सुरू झालेला न्यायालयीन संघर्ष आतापर्यंत सुरू होता. मात्र, दोघांच्या वकिलांनी पुढाकार घेत मित्रात संवाद घडवून आणला.
दोघांना तडजोडीच्या माध्यमातून वाद संपविण्याची भूमिका पटवून दिली. दोघांना पटले. दोघांनी जुने मतभेद बाजूला ठेवत परस्पर संमतीने समझोता केला.
“दहा वर्षे चाललेला न्यायालयीन वाद संपविणे हा केवळ कायदेशीर विजय नसून, दोन्ही पक्षकारांना शांततेने पुन्हा पुढे जाण्याची संधी देणे हा खरा उद्देश आहे. आर्थिक वादातून निर्माण झालेली कटुता संवाद आणि परस्पर समजुतीने दूर झाली. दोघांची मैत्री पुन्हा जपली गेली.” – ॲड.सुधीर मुळे, मोनूचे वकील





