पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन तोडफोड प्रकरणी ९ अल्पवयीन मुलांसह त्यांच्या पालकांविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात वाहन तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश मोठा आहे. यासाठी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी एक ॲक्शन प्लॅन केला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अशा प्रकरणांची गंभीर दखल घेत पालकांनाही मुलांच्या कृत्यांची जबाबदारी स्विकारावी लागेल, असा इशारा दिला होता
दांडेकर पूल नव महाराष्ट्र भागामध्ये १८ मार्चला तीन दुचाकींवर येवुन काही मोटार सायकलींची तोडफोड केली होती. पर्वती पोलिसांच्या तपास पथकाने तत्काळ कारवाई करुन गुन्ह्यातील सर्व अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली. तसेच, गुन्ह्यामध्ये या बालकांना हत्यारे देणारा लोहार भावेश दिपक चव्हाण ( वय २१, रा. आग्रसेन भवन शेजारी, रविवार पेठ ) यालाही अटक करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलांना वाहन मालक आणि पालकांनी गाडी वापरण्यासाठी दिल्याने त्यांनाही गुन्ह्यात सह आरोपी करण्यात आले आहे. मुले अल्पवयीन असल्याचे माहित असताना व त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा कोणताही वैध परवाना नसल्साने पालकांना देखील कायद्याच्या कक्षेत घेण्यात आले. गुन्हयात वापरलेल्या सर्व मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पवार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अनिस तांबोळी, सुर्या जाधव, दयानंद तेलंगे-पाटील, सद्दाम शेख, अमोल दबडे, अमित चिव्हे, पुरुषोत्तम गुन्ला, अक्षय खन्ना यांनी केली आहे.
२० टक्के आरोपी अल्पवयीन…
शहरात वाहन तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांतील आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. या मुलांकडून वारंवार असे गुन्हे घडत असतील, तर त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.
गेल्या तीन वर्षांतील गुन्ह्यांतील २० टक्के आरोपी अल्पवयीन असल्याचे दिसून आले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आगामी काळात अल्पवयीन आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून, त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.