T20 World Cup 2024 : – बंगलादेशमध्ये सुरु असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर बंगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात बंगलादेशात होणाऱ्या महिलांच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. स्पर्धेसाठी अजून कालावधी असून देखील, आयसीसी स्पर्धा अन्य स्थळी हलविण्याचा पर्यायाचा विचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बांगलादेशकडून महिला टी-20 विश्वचषकाचे यजमानपद हिरावून घेतले जाऊ शकते.
सुमारे 18दिवस चालणाऱ्या ही स्पर्धेत 10 देश सहभागी होणार आहेत. बंगलादेशातील असणाऱ्या ढाका येथील शेरे बांगला आणि सिल्हेट मधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान 23 लढती खेळविण्यात येणार आहेत. सध्या बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेने बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने तिकीट प्रक्रिया देखील सुरु केलेली नाही. त्यामुळे सर्वच गोष्टींबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
राजकीय अस्थिरतेचे हादरे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापनास देखील बसण्याची शक्यता आहे. या विषयांवर लवकरच आयसीसीशी चर्चा करण्यात येणार असल्याचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले आहे. कोलंबोमध्ये आयसीसीच्या वार्षिक परिषदेमध्ये देखील काही सदस्य राष्ट्रांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र या मुद्द्याचा अजेंड्यामध्ये समावेश नसल्याने यावर औपचारिक चर्चा झाली नव्हती.