राज्यात करोनाचा पुन्हा उद्रेक : ११४ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

मुंबई : राज्यात करोनाच्या संसर्गात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी (६ जून) राज्यभरातून ११४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, यावर्षीची ही एकाच दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. मुंबईत ३७, तर पुण्यात ४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासोबतच करोनामुळे एका रुग्णाचा मृत्यूही झाला असून, राज्यातील एकूण मृतांची संख्या आता १८ वर पोहोचली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत राज्यात एकूण १५,५१० करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १,२७६ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५७७ रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणांसह घरीच उपचार घेत आहेत. आतापर्यंत ६८१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
जिल्हानिहाय रुग्णवाढीची स्थिती :
शुक्रवारी आढळलेल्या ११४ नव्या रुग्णांमध्ये पुढील प्रमाणे विभागवार रुग्ण आढळले:
पुणे महापालिका क्षेत्र : ४२
मुंबई महापालिका क्षेत्र : ३७
मीरा-भाईंदर व पनवेल महापालिका : प्रत्येकी ७
पिंपरी-चिंचवड महापालिका : ६
नवी मुंबई महापालिका : ४
कल्याण-डोंबिवली महापालिका : ३
पुणे जिल्हा (इतर भाग) : २
ठाणे, कोल्हापूर, सांगली, परभणी, सातारा व छत्रपती संभाजीनगर : प्रत्येकी १
करोनामुळे एकाचा मृत्यू
राज्यात शुक्रवारी झालेला मृत्यू हा मधुमेह व उच्च रक्तदाब या सहव्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णाचा आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता १८ वर गेली आहे.
मुंबईतील एकूण आकडेवारी
मुंबईत आतापर्यंत एकूण ६१२ रुग्णांची नोंद झाली आहे. एकट्या शुक्रवारी ३७ नवे रुग्ण सापडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर वाढत असला तरी नवीन रुग्णवाढही चिंतेचा विषय ठरत आहे.
सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सतर्क असून, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवून उपचार सुरू आहेत. नागरिकांनी मास्क, हात स्वच्छता आणि गर्दी टाळण्याचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.





