नवी दिल्ली – नीट-सुपर स्पेशिलिटी परीक्षेच्या पॅटर्नमधील बदल पुढील शैक्षणिक वर्षापासून (2022-23) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याविषयीची माहिती बुधवारी केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. त्यामुळे हजारों तरूण डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.
संबंधित परीक्षेसाठी 13 आणि 14 नोव्हेंबर या तारखा निश्चित करण्यात आल्या. ते वेळापत्रक 23 जुलैला जाहीर करण्यात आले. त्यानंतर परीक्षा पॅटर्न बदलाविषयीची अधिसूचना जारी करण्यात आली. अखेरच्या क्षणी करण्यात आलेल्या त्या बदलाला आव्हान देत 41 डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
त्यावरून न्यायालयाने परीक्षार्थींविषयी अनुकूल भूमिका घेत सरकारला फटकारले. परीक्षार्थींना खूप आधीपासून परीक्षेची तयारी करावी लागत असल्याची बाब न्यायालयाने अधोरेखित केली. संबंधित प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने कडक भूमिका घेतली. परीक्षा पॅटर्नमधील बदल मागे घेण्यावर विचार करण्यासाठी एक संधी देत आहोत. बुधवार सकाळपर्यंत तोडगा घेऊन यावे, असे म्हणत न्यायालयाने एक दिवसाची मुदत दिली.
त्यापार्श्वभूमीवर, परीक्षार्थींच्या हितासाठी बदल वर्षभरासाठी लांबणीवर टाकण्यात येत असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. आता नव्याने प्रक्रिया करावी लागणार असल्याने आगामी परीक्षा काही दिवस लांबणीवर पडण्याचे संकेतही सरकारकडून देण्यात आले.