सोलापूर : काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी अखेर शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला असून, अक्कलकोट येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी भगवा हाती घेतला. विशेष म्हणजे या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार राजू खरे व्यासपीठावर दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कार्यक्रमासाठी शिंदे सोलापूरात पोहोचणार होते, मात्र नाईट लँडिंग नसल्याने त्यांचे विमान कलबुर्गीला वळवण्यात आले. तांत्रिक कारणांमुळे कार्यक्रमास उशीर झाला, पण त्यातच व्यासपीठावर उपस्थित असलेले राजू खरे यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. याआधीही त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या फार्महाऊसला भेट दिली होती, त्यानंतर आता ते एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी थेट व्यासपीठावर दाखल झाले आहेत. खरे हे विरोधी बाकावर बसत असल्यामुळे त्यांचे पक्षांतर होण्याच्या चर्चा वारंवार होतात. दुसरीकडे, काँग्रेससोबत अनेक वर्षांचा संबंध असलेल्या सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश करताना “शिवसेना हाच खऱ्या अर्थाने सेक्युलर पक्ष आहे”, असे विधान करत भाजपसोबत असलेल्या शिंदे गटाच्या इमेजवरही बोट ठेवले. “माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता, त्यामुळे मी शिंदे गटात प्रवेश घेतला,” असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शिवसेना हा खऱ्या अर्थाने सेक्युलर पक्ष : सिद्धाराम म्हेत्रे दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत असलेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशापूर्वी सिद्धाराम म्हेत्रे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना शिवसेना हाच खऱ्या अर्थाने सेक्युलर पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले. ”शिवसेना हाच खऱ्या अर्थ्याने सेक्युलर पक्ष, त्यामुळे इथे काम करताना मला कोणीतीही अडचण नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह होता एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले पाहिजे. अशी प्रतिक्रिया सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.