Mumbai Flyover: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, तीन महत्त्वाच्या उड्डाणपुलांचे आज लोकार्पण
Mumbai Flyover: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १ वाजता व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण होणार

Mumbai Flyover: मुंबई शहरासह उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ३ महत्वाच्या उड्डाणपुलांचे लोकार्पण आज करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १ वाजता व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण पार पडेल.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची उपस्थिती असेल. दरम्यान, सायन रेल्वे स्थानकाजवळील पुनर्बांधणी केलेला रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार स्थानकाजवळील पूर्व-पश्चिम जोडणारा पूल आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील उड्डाणपूल या प्रकल्पांचा यात समावेश आहे.
सायन उड्डाणपूल
सायन रेल्वे स्थानकाजवळील ११२ वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल असुरक्षित घोषित झाल्याने त्याची नवी उभारणी करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला या पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या विस्तारातील सर्वात मोठा अडथळा या नव्या पुलामुळे दूर झाला आहे.
तसेच धारावी, वांद्रे, बीकेसी, कुर्ला आणि पूर्व द्रुतगती महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना हा पूल उपयुक्त ठरेल. फेब्रुवारी २०२७ ची डेडलाईन असताना सर्व अडचणींवर मात करत हे काम चार महिने आधीच पूर्ण करण्यात आले.
विद्याविहार उड्डाणपूल
विद्याविहार येथील हा पूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्गाला थेट जोडतो. यामुळे विद्याविहार ते घाटकोपर दरम्यानचा प्रवासाचा वेळ ३० मिनिटांवरून थेट १० मिनिटांवर येईल.
तसेच घाटकोपर उड्डाणपुलावरील अतिरिक्त वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एकूण ६०० मीटर लांबीच्या आणि १५.५० ते १७.५० मीटर रुंदीच्या दोन मार्गिकांचा आहे. या पुलाचे बांधकाम दोन टप्प्यांत विभागले आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग उड्डाणपूल
गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शनजवळ १.२६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. हा पूल जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग ते संतोषनगर परिसरातील दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गाला जोडतो.
या उड्डाणपुलामुळे गोरेगाव – मुलुंड जोडरस्त्यांतर्गत जुळ्या बोगद्यांद्वारे पूर्व व पश्चिम उपनगरांदरम्यान जोडणी तसेच जनरल अरुणकुमार वैदय मार्ग, दिंडोशी न्यायालय, हॉटेल रत्नागिरी जंक्शन, वालभट नदी चौक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होऊ शकते.
हेही वाचा:
Lalit Prabhakar: ‘मी नामदेव ढसाळ आणि मी एक दलित…”; ललित प्रभाकरचा ‘ढसाळ’ सिनेमातील लक्षवेधी लूक समोर





