ठाकरेंच्या २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली; तुम्हाला एवढ्या जागा दिल्या तर आम्ही लढायचे कुठे? काँग्रेस नेत्यांचा सवाल

मुंबई – शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी केलेली २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळल्याची माहिती आहे. ठाकरे गटाला एवढ्या जागा दिल्या तर आम्ही लढावे कुठे? असा सवाल काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील जागा वाटपाचा तिढा अधिकच क्लिष्ट होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीसोबत सध्या किती मते आहेत? हे कुणालाही माहिती नाही. पण काँग्रेसकडे किती मते आहेत, हे सर्वांना ठावूक आहे. आमच्याकडेही नेते व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे तुम्ही एकत्र बसून जागा वाटपावर निर्णय घ्या. त्यात आपल्या सर्वांचेच भले आहे, असे ते म्हणाले आहेत.
निरुपम पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस व कदाचित वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित आघाडी होईल. त्यात एखाद्या घटक पक्षाने जास्त जागांचा आग्रह धरला तर त्यामुळे सर्वांचेच नुकसान होईल. आपण सर्वजण एकत्र येवून चर्चा करू व ज्या जागा निवडून येतील त्या एकमेकांना वाटप करू.
‘वंचित’वर वरिष्ठ पातळीवर निर्णय
वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत येण्यासंबंधी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आमचे नेतृत्व त्यावर नक्कीच विचार करेल. काँग्रेस मुंबई उत्तर पश्चिम जागेवर केव्हाही तडजोड करणार नाही.
ही जागा काँग्रेसची आहे. तिथे काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे ही जागा आम्ही सोडणार नाही. मुंबईत राष्ट्रवादीला जनाधार नाही. त्यामुळे तेथील ६ जागांचे शिवसेना व काँग्रेस या २ पक्षांत प्रत्येकी ३ जागा विभागल्या जाव्यात असे आमचे मत आहे, असेही संजय निरुपम म्हणाले.





