कॉंग्रेस खासदार म्हणतात, “अरविंद केजरीवाल यांचा निर्णय अतिशय योग्य…’

श्रीनगर – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजीनाम्याचा निर्णय अतिशय योग्य आहे. कारण, भाजपने निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे पदावर राहून ते काहीच साध्य करू शकले नसते, असे मत कॉंग्रेसचे खासदार विवेक तन्खा यांनी व्यक्त केले.
केजरीवाल यांची अवस्था कोंडी झाल्यासारखी होती. त्यांना जबरदस्तीने तुरूंगात ठेवण्यात आले होते. केंद्रीय यंत्रणा त्यांना जाऊ देत नव्हत्या. सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने ते तुरूंगाबाहेर येऊ शकले.
ते आणखी काय करू शकले असते, अशी विचारणा तन्खा यांनी पत्रकारांशी बोलताना केली. मुख्यमंत्री असेपर्यंत भाजपने त्यांना कार्य करू दिले नसते. तसेच, बराच काळ बाहेर राहू दिले नसते.
त्यामुळे ज्या गोष्टीने त्रास होतोय ती सोडण्याचा विचार त्यांनी केला असावा. केजरीवाल यांना त्यांची विश्वासार्हता वाढवायची असावी. तसेच, भाजपविरोधी लढा रस्त्यांवर उतरून लढायचा असावा असे मला वाटते.





