Gujarat Election 2022 : कॉंग्रेसने सरदार पटेलांचा कायम अवमानच केला – अमित शहा

खंभात – कॉंग्रेसने सरदार वल्लभभाई पटेलांचा ( Sardar Vallabhbhai Patel)कायम अवमानच केला आहे. त्यांची अवहेलना करण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व केले आणि आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता सरदार पटेल यांची स्तुती करण्यास सुरुवात केली आहे असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.
अमित शहा सध्या गुजरातच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज येथील प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की, सरदार पटेल यांचे अंतिम संस्कारदेखील पूर्ण सन्मानाने केले गेले नाहीत. कॉंग्रेस आता सरदार पटेलांची स्तुती करते याचे मला आश्चर्य वाटते.
माझ्या लहानपणापासून मी कोणत्याही कॉंग्रेस नेत्याला पटेल यांच्याबद्दल बोलताना ऐकले नाही. उलट पटेल यांचा अपमान करण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोणतेही स्मारक बांधले गेले नाही, असे शहा म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात खंभात आणि इतर 92 जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानिमीत्त येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना शहा पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच स्टॅच्यू ऑफ युनिटी, या नावाने पटेलांचा पुतळा गुजरातमध्ये उभारला आहे. जो जगातील सर्वात उंच पुतळा समजला जातो. त्याद्वारे पटेलांना खरी श्रद्धांजली अर्पण केली गेली आहे, असेही ते म्हणाले.





