Kerala : कोणाला घाबरण्याची गरज नाही – शशी थरूर

मालाबार – कॉंग्रेस नेते शशी थरूर सध्या त्यांचे गृहराज्य असलेल्या केरळच्या दौऱ्यावर असून त्यांना तेथे चांगला प्रतिसाद मिळत आहे. थरूर यांच्या दौऱ्यामागे आणि भेटीगाठींमागे काहीतरी अजेंडा असावा आणि त्यांना केरळ कॉंग्रेसमध्ये आणखी एक गट निर्माण करण्याची इच्छा असावी, अशी भीती कॉंग्रेसच्या काही नेत्यांना वाटत असून या घडमोडींमुळे स्वत: थरूर मात्र विचलीत झालेले नाहीत. आपण कोणाला घाबरत नाही आणि कोणी आपल्याला घाबरण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, केरळ कॉंग्रेसमध्ये अगोदरच ए (अँटनी) आणि आय (करुणाकरन) हे दोन गट आहेत. आता आणखी कोणत्या गटाची गरज नाही तर कॉंग्रेसला आता केवळ यु (युनायटेड म्हणजे संयुक्त) गटाची गरज असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
दरम्यान, थरूर यांनी पनक्कड येथे सादीक अली शिहाब थंगल यांच्या निवासस्थानी इंडियन युनियन मुस्लीम लीग अर्थात आययुएमएलच्या नेत्यांची भेट घेतली. त्यावरूनही राज्यात कॉंग्रेसच्या गोटात खळबळ सुरू आहे.
त्यावर बोलताना आययूएमएलच्या नेत्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील एका कार्यक्रमाला जात असताना शिष्टाचार म्हणून ही भेट झाली. त्याला राजकीय महत्त्व नाही. आम्ही कोणीही येथून जातो तेव्हा थंगल यांची भेट घेत असतो. त्यामुळे या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही.
स्वत: थंगल यांनीही याबाबत भाष्य केले आहे. थरूर यांच्याशी आमचे घनिष्ठ संबंध असल्याचे व नेहमीच भेटी होत असल्याचे त्यांनी सांगितले. थरूर यांनी केरळमध्ये सक्रिय झाले पाहिजे का, असे विचारल्यावर थंगल म्हणाले की ते दुसऱ्यांदा येथून खासदार झाले आहेत. त्यामुळे ते पूर्वीपासूनच सक्रिय आहेत.



