Municipal Elections Voting | राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र मतदानाला सुरुवात झाल्यापासून मतदान केंद्रांवरील मशीन बंद पडण्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर काही वेळात मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे बोगस मतदानाची भीती व्यक्त केली जात असून राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, नागरिकांच्या बोटावर शाईऐवजी मार्करने खूण केली जात आहे. पण या मार्करची शाई बोटावरुन पुसली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बोटावर मार्कर वापरताना नखावरील शाई पुसली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत आणि हे सत्य असल्याची कबुली मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनीही दिली. मार्कर कीट निवडणूक आयोगाकडून पुरवण्यात आले मात्र, हे मार्कर कीट महापालिका प्रशासनाने स्वतः तयार केलेले नसून ते राज्य निवडणूक आयोगाकडून पुरवण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हा मार्कर २०१२ पासून राज्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात आहे. पारंपारिक शाईच्या बाटल्या हाताळण्यापेक्षा मार्कर वापरणे सोपे आणि सुटसुटीत असल्याने हा बदल करण्यात आला होता. राज ठाकरेंकडूनही संशय व्यक्त दरम्यान, मनसे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी या मार्करच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील नवीन मतदान शाईच्या पेनाबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच ही शाई सॅनिटायझरने पुसली जात असल्याचा आरोप आहे. याशिवाय राज ठाकरे यांनी व्हीव्हीपॅटच्या वापरातील पारदर्शकतेचा अभाव आणि पाडू नावाचे नवीन यंत्र मतमोजणीसाठी वापरले जाणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला. हेही वाचा: Pune News : येवलेवाडी परिसरात आचारसंहिता भंगप्रकरणी मोठी कारवाई