पुणे : 15 पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६ च्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी कडक पावले उचलली आहेत. येवलेवाडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात भरारी पथकाने (F.S.T.) केलेल्या कारवाईत संशयित वाहनांतून १ लाख रुपयांची रोकड, मतदार यादी व मोठ्या प्रमाणावर प्रचार साहित्य जप्त करण्यात आले आहे. दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास बधे स्टील, खडीमशीन चौक परिसरात आचारसंहितेचा भंग होत असल्याची माहिती येवलेवाडी पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त भरारी पथक व येवलेवाडी पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान टोयोटो इनोव्हा (क्रमांक MH-12 RL 3009) व ब्रिझा (क्रमांक MH-12 QC 3009) ही दोन वाहने संशयास्पद स्थितीत लॉक अवस्थेत आढळून आली. इनोव्हा गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल, एकूण १,००,००० इतकी रोकड सापडली. तर दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी ब्रिझा गाडीची तपासणी येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. यावेळी गाडीतून एक खाकी बॉक्स, मतदारांची यादी, २२५ पांढरे व ८० खाकी रंगाचे रिकामे लिफाफे, २१ लहान वह्या, ८ मोठ्या वह्या तसेच १२ पॅम्प्लेट्स असा प्रचार साहित्याचा साठा मिळून आला. या सर्व साहित्याचा पंचनामा करून जप्ती करण्यात आली असून, प्रकरणाची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. आचारसंहिता भंगप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.