प्रभात वृत्तसेवा पुणे : भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असून जागा वाटपाच्या चर्चेत राष्ट्रवादीने राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ( राशप) ३५ ते ४० जागा देण्याची प्राथमिक तयारी दर्शविली आहे. महापालिकेत २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांमधील ३३ नगरसेवक राष्ट्रवादीकडे आहेत, तर ११ नगरसेवक राशपकडे आहेत. त्यामुळे ७५ टक्के जागांची मागणी राष्ट्रवादीची आहे.त्यामुळे राशपची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यातच, राशपचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याने पक्षाचे नियोजन कोलमडले आहे. सध्या दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा अद्यापही प्राथमिक पातळीवर आहे.निवडणूक अर्ज भरण्यासाठी शेवटचे तीनच दिवस शिल्लक असले तरी दोन्ही राष्ट्रवादीतील चर्चेला मूर्त रुप येताना दिसत नाही. पहिल्या बैठकीत जागा वाटपाच्या चर्चेवेळी ज्या पक्षाचा उमेदवार २०१७ मध्ये निवडून आलेला असेल त्याची जागा निश्चित असे ठरले होते. पुढील बैठकीत चर्चा करण्याचे ठरले. मात्र, राशपमध्ये प्रशांत जगातपांच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या गोंधळामुळे ही चर्चा पुढे गेली नाही. त्यानंतर, गुरुवारच्या बैठकीत ७५-२५ असा फाॅर्म्युला चर्चेसाठी ठेवला गेला. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे राशपची चांगलीच कोंडी झाली असून पुढील दोन दिवसांत तिढा न सुटल्यास पक्षाला मोठा फटका बसणार आहे. पुन्हा काॅग्रेसला साद दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडी म्हणून राशप, काॅग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र लढणार होते. त्याबाबत प्राथमिक बैठकाही झालेल्या होत्या. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राशपचे ४४, शिवसेना ठाकरे गट तर काॅग्रेसचे ९ नगरसेवक निवडून आले होते. त्यानुसार राशपने बैठकीत जवळपास दुप्पट जागांवर दावा केला. मात्र, राशपला एकत्र असताना मिळालेल्या जागंपेक्षाही कमी जागा देण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याने राशपने पुन्हा महाविकास आघाडी अथवा काॅग्रेससोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राशपने पुण्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. शनिवार सकाळपर्यंत जागावाटपाचा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे काँग्रेस सूत्रांनी सांगितले.