सोमय्या धक्काबुक्कीप्रकरणी आयुक्तांनी खुलासा द्यावा : महापौर

पुणे – माजी खासदार किरीट सोमय्या यांना मनपा आवारात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे लेखी खुलासा मागितला आहे. याबाबतचे पत्र महापौरांनी मंगळवारी आयुक्तांना दिले.
पत्रानुसार, “मागील आठवड्यात शनिवारी खासदार सोमय्या महापालिकेत आले होते. त्यावेळी त्यांना धक्काबुक्की झाली ही बाब गंभीर आहे. त्यामुळे पालिकेच्या सुरक्षे व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याशिवाय या दौऱ्याबाबत महापालिकेस अवगत करण्यात आलेले असतानाही त्यांना योग्य ती सुरक्षा व्यवस्था का देण्यात आली नाही?
शनिवारी महापालिकेस सुट्टी असतानाही शिवसैनिकांना महापालिकेत का आणि कोणी प्रवेश दिला? सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत पदाधिकाऱ्यांना का अवगत करण्यात आले नाही, असे सवाल महापौरांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणी तत्काळ खुलासा करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.





