Pune District | आ. राहुल कुल यांच्या मंत्रीपदासाठी ग्रामदेवतेला साकडे

पारगाव, – मागील दोन विधानसभा निवडणुकीच्या वेळी मंत्री पदाची संधी असतानाही ती संधी हुकली होती. मागील दोन वेळेच्या अनुभवावरून या वेळेस मात्र दौंड तालुक्याला लाल दिवा मिळाला पाहिजे, यासाठी अनेक गावांमधून कार्यकर्त्यांनी देवाचा अभिषेक केला. तसेच काही ठिकाणी देवाला साकडे घालून गावजेवण घातले.
आज पारगाव येथील १४ विवाहित जोडप्यांनी ग्रामदैवत श्री तुकाई देवीचरणी अभिषेक करून आमदार राहुल कुल यांना मंत्रिपद मिळावे, असे देवीला साकडे टाकले आहे. या वेळी भानुदास शिंदे, सुभाष शिंदे, भाऊसो बोत्रे, बापू साळुंके, विजय शिवरकर, राजू महानोर, सागर ताकवणे, शरद शिशुपाल, नागेश मोरे, गौरव चव्हाण, संकेत ताकवणे, विक्रम शिंदे, योगेश वनशिव, राजेंद्र मोरे या १४ जोडप्यांनी मिळून अभिषेक केला. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अतुल ताकवणे माजी तंटामुक्ती अध्यक्ष अॅड वैभव बोत्रे सामाजिक कार्यकर्ते अश्पाक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार राहुल कुल यांची महायुतीमध्ये मंत्रिपदी वर्णी लागावी, यासाठी बोरीपारधी ग्रामस्थांच्या वतीने चौफुला (ता. दौड) येथील ग्रामदैवत श्री बोरमलनाथ महाराजांना साकडे घालण्यात आले. भीमा-पाटस साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, सरपंच बाळासाहेब सोडनवर, कैलास शेलार यांच्या उपस्थितीत श्री बोरमलनाथ महाराज मंदिरात महाभिषेक करण्यात आला. तसेच विधानसभा निवडणुकीत दौंडचे आमदार राहुल कुल हे तिसऱ्यांदा निवडून यावेत म्हणून केडगावच्या शेंडगे वस्ती येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या युवकांनी वस्तीजवळ बांधण्यात आलेल्या मांढरदेवी काळुबाईला नवस केला होता.
आमदार राहुल कुल हे तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर केलेला नवसाची पूर्तता करण्यासाठी कांचन कुल यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली व येथील गावकऱ्यांना जेवण देण्यात आले. या प्रकारे अनेक विविध कार्यकर्त्यांनी देवांना नवस केले आहेत.
उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन
वरवंड येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंडला मंत्रिपदाचा शब्द दिला होता आणि आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट होत असल्याने दौंडकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.





