Chinchwad Substation Fire: अर्ध्या शहराचा वीज पुरवठा खंडीत! महापारेषणच्या चिंचवड वीज उपकेंद्रात आग…नेमकं काय घडलं?
Chinchwad Substation Fire: महापारेषणच्या चिंचवड २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रात २२ केव्ही ब्रेकरचा स्फोट; पिंपरी, वाकड, सांगवीसह अनेक परिसरांतील वीज पूर्णपणे खंडित.

Chinchwad Substation Fire – महापारेषण कंपनीच्या चिंचवड येथील २२० केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात रविवारी (दि. ६) दुपारी १२.२५ वाजेच्या सुमारास तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. २२ केव्ही सीटी व ब्रेकरमध्ये स्फोट झाल्यानंतर उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ उठले. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम होऊन अर्ध्या शहराचा वीजपुरवठा खंडीत झाला.
सायंकापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले होते. मात्र, बिघाड झालेला भाग बंद ठेवण्यात आला. या घटनेमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या अनेक २२ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वाहिन्या बाधित झाल्या. परिणामी पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश भागासह प्राधिकरण, रावेत, काळेवाडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, पुनावळे, ताथवडे, थेरगाव तसेच परिसरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला.
दरम्यान, महापारेषणकडून बिघाड झालेला भाग वगळता उपकेंद्रातील उर्वरित भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच महावितरणकडून पर्यायी मार्गाने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांना कमीत कमी वेळ वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागावे, यासाठी दोन्ही कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.
चिंचवड येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आग लागल्यानंतर परिसरातून लांब पर्यंत आगीच्या धुराचे लोट आणि धूर दिसत होत्या. घटनेची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले; मात्र उपकेंद्र हा अतिशय संवेदनशील वीजप्रकल्प असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन दलाच्या जवानांना थेट आतमध्ये प्रवेश करण्यास अडथळे निर्माण झाले.
शहरामध्ये दुपारपर्यंत दमट वातावरण होते. परिणामी, उकाड्यामुळे घरात राहणेही नागरिकांसाठी त्रासदायक ठरले. पंखे, कूलर तसेच इतर विद्युत उपकरणे बंद पडल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि घरातून काम करणाऱ्या नागरिकांना विशेष अडचणींचा सामना करावा लागला. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक घरांमधील वाय-फाय राऊटरही बंद पडले.
अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान
विशेष म्हणजे, घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाला महावितरणकडून सुरुवातीला कोणतीही स्पष्ट पूर्वकल्पना अथवा आवश्यक तांत्रिक माहिती देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. उपकेंद्रातील कोणता भाग विद्युतप्रवाहाखाली आहे, कोणता भाग सुरक्षित आहे तसेच आग नेमक्या कोणत्या उपकरणामुळे लागली, याबाबत आवश्यक माहिती उपलब्ध नसल्याने अग्निशमन दलासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले.
नागरिकांची गैरसोय
वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. रविवारची सुट्टी असल्याने अनेक नागरिकांनी कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे, बाहेर जाण्याचे किंवा घरातील विविध कामे करण्याचे नियोजन केले होते. मात्र दुपारच्या सुमारास अचानक वीज गेल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला.






