China Open 2024 : मालविकाचा विजयी धडाका सुरूच, चीन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक….

China Open 2024 (Malvika Bansod) :- भारताच्या मालविका बनसोडने 25व्या मानांकित स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरचा पराभव करतातना चीन सुपर 1000 ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. यापूर्वीच्या लढतीमध्ये मालविकाने पॅरिस ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगला पराभूत करण्याची कामगिरी केली होती.
जागतिक क्रमवारीत 43व्या स्थानी असलेल्या मालविकाने एक तास पाच मिनिटांच्या लढतीनंतर विजय साकारला. या लढतीत मालविकाने दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरला 21-17, 19-21, 21-16 असे पराभूत केले.
#ChinaOpen2024: India’s Malvika Bansod defeats world number 25 Kirsty Gilmour of Scotland in women’s singles. #Badminton🏸 pic.twitter.com/OVAvHJpmM9
— All India Radio News (@airnewsalerts) September 19, 2024
पहिल्या सेटमध्ये मालविकाने 21-17 अशी बाजी मारली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये क्रिस्टी गिलमोरने आपला खेळ उंचावताना 19-21 असा सेट जिंकला. यावेळी दोघींची 1-1 अशी बरोबरी झाली होती. त्यानंतर मालविकाने संयम आणि आक्रमकता याचे सुरेख मिश्रण करताना तिसरा सेट 21-16 असा जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
माझे स्वप्न पूर्ण झाले असून मी प्रथमच सुपर 1000 स्पर्धेची उपांत्यफेरीत प्रवेश केला असल्याचे मालविकाने लढतीनंतर बोलताना सांगितले. मालविकासमोर उपांत्यपूर्व फेरीत दोन वेळेची विश्वविजेती व चौथ्या मानांकित जपानच्या अकाने यामागुची हीचे आव्हान असणार आहे. ही लढत शुक्रवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 7.30 वाजता सुरू होईल. मालविका वगळता भारतीय खेळाडूंचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.





