China Open 2024 : कोको गॉफची उपांत्य फेरीत धडक; स्पेनच्या बडोसाचे असणार आव्हान…

China Open 2024 : अमेरिकेची सहावी मानांकित खेळाडू कोको गॉफने युक्रेनच्या युलिया स्टारोडबत्सेवाविरुद्ध पहिल्या सेटमधील पिछाडीनंतर जोरदार पुनरागमन केले आणि गुरुवारी बीजिंग येथे विजयासह चायना ओपनच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. गॉफने जागतिक क्रमवारीत 115व्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूचा 2-6, 6-2, 6-2 असा पराभव करत आगेकूच केली.
अन्य एका उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या 19व्या मानांकित पॉला बडोसाने स्थानिक स्पर्धक झांग शुईचा 6-1, 7-6 (4) असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीमध्ये गॉफचा सामना स्पेनच्या पॉला बडोसाशी (Coco Gauff vs Paula Badosa) होणार आहे. उपांत्य फेरीचा हा रोमाचंक सामना शनिवारी(5 आॅक्टोबर 2024) भारतीय प्रमाणवेळनुसार सकाळी 11.45 वाजता सुरू होईल.
दरम्यान, बडोसाने मे पासून 35 पैकी 28 सामने जिंकले आहेत आणि गेल्या पाच पैकी तीन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतही तिने मजल मारली होती.





