Denmark Open 2024 : लक्ष्य, मालविका अन् आकर्षीला पराभवाचा धक्का…

Denmark Open 2024 (Badminton) :– भारताचे शटलर्स लक्ष्य सेन व मालविका बनसोड यांना डेन्मार्क ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर लक्ष्यला आर्टिक ओपन व डेन्मार्क ओपन अशा दोन्ही स्पर्धेत चमकदार कामगिरी करता आली नाही. रितुपर्णा आणि स्वेतापर्णा पांडा यांच्या जोडीला देखील पराभावाचा सामना करावा लागला.
भारताच्या लक्ष्य सेन (Lakshya Sen) चीनच्या लू गुआंग जू विरुद्ध चिवट झुंज देऊन देखील पराभूत व्हावे लागले. लू गुआंग जूने लक्ष्यला 70 मिनिटांच्या लढतीत 21-12, 19-21, 14-21 असे पराभूत करताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना 8-8 अशी बरोबरी साधली होती. मात्र त्यानंतर लक्ष्यने सलग तीन गुण मिळवून 11-8 अशी आघाडी वाढविली. त्यानंतर लक्ष्यने सलग 7 गुण घेऊन आघाडी 20-11 अशी वाढवून पहिला सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये देखील लक्ष्यने 8-2 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र लूने आपला खेळ उंचवताना 11-12 अशी 1 गुणाची आघाडी घेतली. त्यानंतर लक्ष्यने पुन्हा एकदा लढतीवर नियंत्रण मिळविताना 16-11 अशी बढत मिळविली. त्यानंतर मात्र, लूने आक्रमकता आणि संयम असा दुहेरी खेळ करताना 19-18 अशी आघाडी घेतली. शेवटी 2 गुण मिळवून 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये चीनच्या लूने हीच गती कायम राखताना लक्ष्यवर दडपण ठेवण्यात यश मिळविले. सलग सहा गुण मिळविताना लूने विजय साकारला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या 22 वर्षीय लक्ष्यला गेल्या आठवड्यात झालेल्या फिनलंडमध्ये आर्क्टिक ओपनच्या दुसऱ्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारताच्या रितुपर्णा आणि स्वेतापर्णा पांडा या बहिणींनाही पहिल्या फेरीत महिला दुहेरीत चायनीज तैपेईच्या चांग चिंग हुई आणि या चिंग तुन यांनी 21-18, 24-22असे पराभूत केले.
मालविका-आकर्षी पराभूत…
चायना ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारलेल्या मालविका बनसोडला (Malvika Bansod) देखील स्पर्धेत पहिल्याच फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. महिला एकेरीच्या लढतीमध्ये व्हिएतनामच्या गुयेन थुय लिन्हने मालविकाचे आव्हान 21-13, 21-12 असे मोडून काढले. भारताच्या आकर्षी कश्यपाला देखील पराभवाचा सामना करावा लागला. थायलंडच्या सुपानिडा काटेथोंगने 21-13, 21-12 असे आकर्षीला पराभूत केले.





