China Masters 2024 : सिंधू पाठोपाठ अनुपमा अन् मालविकाचेही आव्हान संपुष्टात….

China Masters 2024 : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूसह अनुपमा उपाध्याय आणि मालविका बन्सोड यांना गुरुवारी झालेल्या दुसऱ्या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे शेन्झेन येथे चालू असलेल्या चायना मास्टर्समधील महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आलं आहे.
एक तास नऊ मिनिटे रंगलेल्या लढतीत सिंधूला सिंगापूरच्या येओ जिया मिनकडून 16-21, 21-17, 21-23 असा पराभव पत्करावा लागला. सिंधूची ही सलग सातवी स्पर्धा होती जिथे तिला यावर्षी उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही.
दुसरीकडे, अनुपमा उपाध्याय हिला जपानच्या नात्सुकी निदायरा हिच्याकडून 21-07, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला आणि स्पर्धेतील तिची मोहीम संपुष्टात आली. भारतीय खेळाडू जागतिक क्रमवारीत 26व्या क्रमांकावर असलेल्या नात्सुकीसाठी सोपी प्रतिस्पर्धी असल्याचे सिद्ध झाले आणि उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी 36 मिनिटांच्या लढतीत तिला काहीच अडचण आली नाही. तत्पूर्वी, पहिल्या फेरीत भारताच्या 19 वर्षीय अनुपमा हिने 48 मिनिटे रंगलेल्या चुरशीच्या लढतीत अमेरिकेच्या बेईवेन झेंगचा 21-17, 8-21, 22-20 असा पराभव करत खळबळ उडवून दिली होती.
China Masters 2024 : पी.व्ही. सिंधूचे चायना मास्टर्समधील आव्हान संपुष्टात…
मालविकानेही केली निराशा….
स्पर्धेतील अन्य लढतीत नागपूरची फुलराणी म्हणून ओळख असलेली भारताची बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड हिलादेखील दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मालविका हिला थायलंडच्या सुपनिडा कटेथोंग हिने 21-9, 21-9 अशा फरकाने पराभूत केले. त्याआधी मालविका हिने डेन्मार्कच्या लिन होजमार्क जेगर्सफेल्ट हिच्यावर 20-22, 23-21, 21-16 असा विजय मिळवून आगेकूच केली होती.





