Child Abuse Case : उरुळी कांचन हादरले! अल्पवयीन मुलाला गाडीत नेले आणि…ग्राफिक डिझायनरचे संतापजनक कृत्य
Child Abuse Case : १६ वर्षीय मुलाला अष्टापूरच्या ग्राफिक डिझायनरने गाठले; भांडगाव परिसरात चारचाकी नेऊन केलं अश्लील कृत्य, 'पॉक्सो' नुसार गुन्हा दाखल.

Child Abuse Case – उरुळी कांचन येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अष्टापूर येथील एका ग्राफिक डिझायनरविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागराज कोतवाल (रा. अष्टापूर, ता. हवेली) असे आरोपीचे नाव असून, पीडित मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री उशिरा उरुळी कांचन येथील कस्तुरी लॉन्स परिसरात घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा कामानिमित्त आरोपीच्या ‘नागराज ग्राफिक्स’ कार्यालयात गेला होता.
काम पूर्ण झाल्यानंतर आरोपीने त्याला उशीर होईल असे घरी सांगण्यास सांगून थांबवले. त्यानंतर आरोपीने मुलाला आपल्या चारचाकी वाहनातून पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव (ता. दौंड) येथे नेले. तेथे आरोपीने मुलासोबत जबरदस्तीने अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. तसेच पुढील अनूचित कृत्यांसाठी दबाव टाकण्याचाही प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेनंतर आरोपीने मुलाला पुन्हा उरुळी कांचन येथे आणून सोडले. घरी परतल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत पीडिताने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आईसह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, दुसर्या दिवशी आरोपीने पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





