Shirur Crime: शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटात हाणामारी; 40 जणांवर गुन्हा दाखल
Shirur Crime: या घटनेत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुमारे ४० ते ५० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस ठाण्याच्या आवारातच कायद्याचा भंग झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shirur Crime: शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारातच सोमवारी (दि. १३) मध्यरात्री दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक व मारामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. पोलीस ठाण्याच्या परिसरातच घडलेल्या या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये सुरुवातीला वादावादी झाली. काही वेळातच वाद उग्र होऊन सुमारे ३५ ते ४० जणांचा जमाव जमला आणि त्यांनी एकमेकांवर दगडफेक व हाणामारी सुरू केली. हा प्रकार पोलीस ठाण्याच्या आवारासह पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील पंचायत समिती कार्यालयासमोरही घडला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव आक्रमक झाल्याने परिस्थिती चिघळली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुमारे ४० ते ५० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस ठाण्याच्या आवारातच कायद्याचा भंग झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




