Nagar | मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना उद्योजिका बनविणार – प्रशांत लोखंडे

राहुरी, (प्रतिनिधी) – राज्यातील महायुतीचे सरकार हे महिलांसाठी विविध योजना राबतव आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी ३५% सबसिडी तर शहरासाठी २५ % सबसिडी आहे. महिलांनी शेती पूरक व्यवसायात प्राधान्याने उतरावे.
ग्रामीण भागातील महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेत असताना अडचण निर्माण झाल्यास संपर्क साधावा. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महिला उद्योजक झाल्या पाहिजे, यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही महाकिसान संघ (नोडल एजन्सी)चे अध्यक्ष प्रशांत लोखंडे यांनी दिली.
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शिवसेना युवा नेते प्रशांत लोखंडे बोलत होते,
यावेळी शेतकरी सेनेचे राज्य प्रमुख धनंजय जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे, सरपंच लीलाताई गायकवाड, सुवर्णा करपे, कवाने ताई, सुभाष जुंदरे, विजय तोडमल, जुगल गोसावी, बाळासाहेब जाधव उपस्थित होते.
धनंजय जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनांच्या माध्यमातून अनेक महिलांना मोठी मदत झाली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मोठ्या शहरांमध्ये शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून मोठे मार्केट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे म्हणाले की, महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. लाडकी बहिण योजनेचा ज्या बहिणींनी लाभ घेतलेला नाही,
त्यांनी तत्काळ अर्ज करावा.शासकीय योजनेचा लाभ घेताना लाभ मिळवताना कुठलीही अडचण भासल्यास शिवसैनिकांना संपर्क साधावा, असे लांबे म्हणाले.
प्रास्ताविक पायल बोबडे यांनी केले.याप्रसंगी सरपंच लिलाताई गायकवाड,शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख वनिता जाधव, सुभाष जुंदरे यांनी मनोगत व्यक्त केले.





