मुख्यमंत्री निधी वादात! अंबादास दानवेंच्या ‘कंजूष’ टीकेला CMOचं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जमा झालेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या (CM Fund) खर्चावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गदारोळ माजला आहे. माजी विधानपरिषद सभापती अंबादास दानवे यांनी आरटीआयमधील आकडेवारीचा हवाला देत, निधीत १०० कोटी जमा असताना केवळ ७५ हजार रुपये खर्च झाल्याचा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘कंजूष प्रमुख’ असल्याची टीका केली होती.
या टीकेला आता मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) तातडीने आणि सडेतोड उत्तर देत दानवे यांचा दावा चुकीचा आणि केवळ एका महिन्याच्या आकडेवारीवर आधारित असल्याचे स्पष्ट केले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर लोकांनी अब्जावधी रुपये पाठवले, पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले फक्त ७५ हजार रुपये, असा आरोप दानवे यांनी केला.
“देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण, राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र ७५ हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का?”, असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे. आरटीआयमधून ही धक्कादायक माहिती समोर आल्याचेही त्यांनी नमूद केले.
श्री अंबादास दानवे जी,
एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर,… https://t.co/81EIolTYla— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 11, 2025
मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा: ‘ती’ आकडेवारी चुकीची
अंबादास दानवे यांच्या या ट्विटनंतर तातडीने मुख्यमंत्री कार्यालयाने यावर स्पष्टीकरण देत वस्तुस्थिती समोर आणली. दानवे यांनी दिलेली माहिती चुकीची असून, केवळ ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन गैरसमज निर्माण केल्याबद्दल सीएमओने नाराजी व्यक्त केली आहे. ही चुकीची माहिती कोणी दिली याची चौकशी सुरू करण्यात आली असून, दोषींवर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयानुसार, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांत मुख्यमंत्री सहायता निधीतून वितरित झालेली मदत ६१ कोटी ५१ लाख ६९८ रुपये इतकी आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो, त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणे अयोग्य ठरेल, असे सीएमओने स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला. शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत दिली जाते असे नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्यांकडून मदत केली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून १४,००० कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्यामुळे मदत सतत वाढत आहे, असे प्रत्त्युत्तर मुख्यमंत्री कार्यालयाने दिले.
एकूणच, दानवे यांच्या टीकेने निर्माण झालेला निधी खर्चाचा वाद मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्पष्टीकरणानंतर अधिक वेगळ्या वळणावर आला आहे. राजकीय आरोपांच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सहायता निधीच्या खर्चाचा सविस्तर आणि अद्ययावत तपशील समोर येणे महत्त्वाचे आहे.





