चिखलदरा : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडीचा वाढता पॅटर्न आता राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. सोलापूर आणि धुळे यानंतर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० (ब) मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांचा बिनविरोध विजय झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. कलोती यांनी पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराने अचानक माघार घेतल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली. मात्र, या माघारीमागे राजकीय दबाव किंवा प्रलोभन होते का, यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. या विजयानंतर आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून, “भाऊ, बिनविरोध झाले,” असे सांगितल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी याप्रकरणी भाजप, मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यावर कडाडून टीका केली आहे. “भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. मुख्यमंत्री थेट निवडणुकीत हस्तक्षेप करून विरोधी उमेदवारांना धमक्या किंवा पैशांचे आमिष देऊन माघार घ्यायला लावत आहेत,” असा गंभीर आरोप ठाकूर यांनी केला. कलोती यांचा पराभव झाल्यास मुख्यमंत्र्यांची प्रतिमा धोक्यात आली असती, म्हणूनच ही प्रक्रिया ‘दमदाटी’ने बिनविरोध केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या वाढत्या बिनविरोध निवडीमुळे मतदारांना पसंतीचा पर्याय मिळत नाहीये, त्यामुळे पारदर्शक निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कलोती यांच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे फोनवरून अभिनंदन केले असले तरी, विरोधकांच्या आरोपांमुळे ही निवडणूक लोकशाही मूल्यांपेक्षा राजकीय शक्ती प्रदर्शनाचा भाग ठरली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.