Yashomati Thakur : लाडक्या बहिणींना सरकारने चटक लावलीय; यशोमती ठाकूर यांची टीका

यवतमाळ : लाडकी बहीण योजना ही महिलांना सक्षम करण्यासाठी नाही, तर त्यांना लाडक्या बहिणींचे मत पाहिजे होती म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना दिली. आता ते समाज कल्याण, आदिवासी विभागाचा पैसा वळता करून घेत आहेत. आदिवासी विभाग व समाज कल्याणचा पैसा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेसाठी वळवू शकत नाही, तसे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. मात्र, सरकार कोर्ट, संविधान हे बाजूला सारून गोंधळ घालत आहे.
लाडक्या बहिणींना सरकारने चटक लावलीय, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केली आहे. राज्यात 50 लाख लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र ठरविल्यानंतर यशोमती ठाकूर म्हणाल्या की, सरकारला महिलांना सक्षम करण्याचे काम करायचे नाही. आज पन्नास लाख महिला अपात्र केल्या. येणाऱ्या काळात आणखी महिला ते अपात्र करणार आहेत, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी सरकारवर निशाना साधला.
दरम्यान, याच मुद्यांवर बोलताना राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की, महाराष्ट्रात आपण जेवढ्या योजना कार्यरत केल्या, त्यात काही बोगस लाभार्थी सातत्याने घुसण्याचा प्रयत्न करतात, जेव्हा आपण योजना जाहीर केली तेव्हा त्यात काही निकष जाहीर केले होते. तरी देखील विरोधक योजने विरोधात वारंवार कितीही अपप्रचार करत असले तरी योजनेसंदर्भातील कुठल्याही निकषामध्ये सरकारने कोणतेही बदल केले नाही.





