Chess Olympiad 2024 : तब्बल 97 वर्ष जुना विक्रम मोडला… बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पुरुष आणि महिला संघांची एकाचवेळी सुवर्णपदाकाला गवसणी….

Chess Olympiad 2024 : बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने असे काही केले आहे जे 97 वर्षात याआधी कधीही होऊ शकले नव्हते. डी गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांच्या जोरावर भारताच्या पुरूष संघानं बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या विभागात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. याशिवाय महिला विभागातही भारताने सुवर्णपदक पटकावले आहे.
यासह बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारताने इतिहास रचला आहे. भारताने 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. आता देशाच्या बुद्धिबळाच्या इतिहासात नवा अध्याय जोडला गेला आहे. बुडापेस्ट येथे 45 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड आयोजित करण्यात आले होते. एकाच ऑलिम्पियाडमध्ये भारताने दोन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारतीय पुरुष संघानं असा मिळवला विजय….
पुरुष संघाने 11व्या आणि अंतिम फेरीत स्लोव्हेनियाविरुद्ध चमकदार कामगिरी केली. भारतीय संघात गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन इरिगाईसी, विदित गुजराती, पंतला हरिकृष्ण आणि श्रीनाथ नारायणन (कर्णधार) यांचा समावेश होता. व्लादिमीर फेडोसेव्हविरुद्ध काळ्या तुकड्यांसह खेळताना जागतिक चॅम्पियनशिप चॅलेंजर डी. गुकेशने आपले तांत्रिक कौशल्य दाखवले. 18 वर्षीय ग्रँडमास्टरने अडचणींवर मात करून विजय संपादन केला, ज्यामध्ये त्याच्या सामरिक क्षमतेने महत्त्वाची भूमिका बजावली.
🇮🇳 India wins the 45th FIDE #ChessOlympiad! 🏆 ♟️
Congratulations to Gukesh D, Praggnanandhaa R, Arjun Erigaisi, Vidit Gujrathi, Pentala Harikrishna and Srinath Narayanan (Captain)! 👏 👏
Gukesh D beats Vladimir Fedoseev, and Arjun Erigaisi prevails against Jan Subelj; India… pic.twitter.com/jOGrjwsyJc
— International Chess Federation (@FIDE_chess) September 22, 2024
अर्जुन एरिगेसीनेही आपल्या खेळात चमकदार कामगिरी करत तिसऱ्या फळीवर जॅन सुबेल्जचा पराभव केला. त्यांचा विजय एका शानदार सेंटर काउंटर डिफेन्स गेममध्ये आला. प्रज्ञानंधाने अँटोन डेमचेन्कोविरुद्ध शानदार विजय नोंदवत भारताला स्लोव्हेनियाविरुद्ध 3-0 असा विजय मिळवून दिला.
भारतीय पुरुष संघाने 22 पैकी 21 गुण मिळवले, ज्यात उझबेकिस्तान बरोबर 2-2 अशा बरोबरीसह इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.या स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने शानदार सुरुवात केली होती. गेल्या आवृत्तीतील चॅम्पियन उझबेकिस्तानविरुद्ध अनिर्णित राहण्यापूर्वी संघाने पहिले आठ सामने जिंकले होते.
दरम्यान, भारतीय पुरूष संघाला पहिले स्थान मिळवण्यासाठी शेवटच्या फेरीत फक्त एक ड्रॉ आवश्यक होता. पण भारताने सर्व सामने जिंकले. त्याआधी दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनला अमेरिकेविरुद्ध 2 गुण गमावावे लागले, त्यामुळे भारताला फायदा झाला आणि पदकही निश्चित झाले होते. भारतानं 21 सप्टेंबर रोजी अव्वल मानांकित अमेरिकन संघाचा पराभव केला होता त्यावेळीच आपले सुवर्णपदक निश्चित झाले होते.
🇮🇳India wins the 45th FIDE Women’s #ChessOlympiad! 🏆 ♟
Congratulations to Harika Dronavalli, Vaishali Rameshbabu, Divya Deshmukh, Vantika Agrawal, Tania Sachdev and Abhijit Kunte (Captain)! 👏 👏 pic.twitter.com/zsNde0tspo
— International Chess Federation (@FIDE_chess) September 22, 2024
भारतीय महिला संघाचीही सुवर्ण कामगिरी…
भारतीय महिला संघानेही चमकदार कामगिरी केली. हरिका द्रोणावली, वैशाली रमेशबाबू, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, तानिया सचदेव आणि कर्णधार अभिजीत कुंटे यांच्या संघाने 11 व्या फेरीत अझरबैजानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. महिला विभागात भारताने शेवटच्या सामन्यात अझरबैजानचा 3.5-0.5 असा पराभव केला. भारतीय महिला संघासाठी ही देखील एक मोठी उपलब्धी आहे, कारण त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट रणनीती आणि संयमाने चमकदार कामगिरी केली.
याआधी भारताने दोनदा जिंकले होते कांस्यपदक
दरम्यान, बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारताने दोन्ही विभागात (महिला-ओपन) सुवर्णपदक जिंकले आहे. भारताला यापूर्वी कधीही असे यश मिळाले नव्हते. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 मध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने कांस्यपदक जिंकले होते. यापूर्वी 2014 मध्येही भारताला कांस्यपदक मिळाले होते.




