Chess Olympiad 2024 : ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी गुकेश-प्रज्ञानंदसह दिव्याचा भारतीय संघात समावेश…

चेन्नई – भारताचे स्टार बुद्धीबळ ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद यांना सप्टेंबरमध्ये बुडापेस्ट, हंगेरी येथे होणाऱ्या आगामी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेतून गुकेशची नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपपूर्वी चांगली तयारी होणार आहे. कारण, जागतिक स्पर्धेत गुकेश समोर सध्याचा विश्वविजेता चीनचा डिंग लिरेनचे आव्हान असेल.
गुकेशने (वय-18) यावर्षी चमकदार कामगिरी केली आहे. एप्रिलमध्ये टोरंटो येथे झालेल्या कँडिडेट्स टूर्नामेंट जिंकून वर्ल्ड चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणारा तो सर्वांत तरुण खेळाडू ठरला.
गुकेश, प्रज्ञानंदसह या संघात अर्जुन एरिगेसी, विदित गुजराती आणि पी. हरिकृष्ण यांचाही समावेश आहे, अशी माहिती ऑल इंडिया चेस फेडरेशनचे (एआयसीएफ) अध्यक्ष नितीन नारंग यांनी दिली आहे. तर महिला संघात डी. हरिका, वैशाली रमेशबाबू, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल आणि तानिया सचदेव यांचा समावेश आहे.




