IND vs BAN 1st Test : अश्विन-जडेजाच्या जोडीने उडवला बांगलादेशचा धुव्वा, पहिल्या कसोटीत भारताचा धमाकेदार विजय….

IND vs BAN 1st Test Highlights : चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा तब्बल 280 धावांनी पराभव केला आणि चौथ्या दिवशीच सामना संपवला. 515 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 234 धावांतच गारद झाला आणि भारताने धमाकेदार विजय मिळवला.
भारताच्या विजयात अष्टपैलू रविचंद्रन अश्विनसह रविंद्र जडेजानं मोठे योगदान दिले. दोघांनीही बॉल आणि बॅटने दमदार कामगिरी करून बांगलादेशचा धुव्वा उडवला. यासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने सर्वबाद 376 धावा केल्या. आर अश्विनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 133 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या.
त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला भारतीय गोलंदाजांनी 47.1 षटकांत 149 धावांत गुंडाळले. या काळात जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वाधिक 4 बळी घेतले.
यानंतर टीम इंडिया दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरली आणि 4 बाद 287 धावा करून डाव घोषित केला. यादरम्यान शुभमन गिलने 176 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 119 धावा केल्या. याशिवाय ऋषभ पंतने 128 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. डाव घोषित केल्यानंतर भारतीय संघाने बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य दिले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 234 धावांवरच गुंडीळले. यादरम्यान रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने मालिकेतील पहिला कसोटी सामना 280 धावांनी जिंकला.





