Chaskaman Dam : फक्त ६ टक्के पाणी शिल्लक! चासकमान धरण नीचांकी पातळीवर; राजगुरूनगरवर जलसंकट
Chaskaman Dam : राजगुरूनगर आणि परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या चासकमान धरणात केवळ ६ टक्के साठा; मान्सून लांबल्याने संकट गडद.

Chaskaman Dam – राजगुरूनगरसह परिसरातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणार्या चासकमान धरणात केवळ 6 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ आणि उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर यांनी केले आहे.
खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याला पाणीपुरवठा करणार्या चासकमान धरणातील जलपातळी झपाट्याने घटत असल्याने राजगुरूनगर शहर आणि धरणाखालील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून शिरूरसाठी पाणी सोडले जात असल्याने धरणातील साठा दिवसागणिक कमी होत आहे. यंदा चासकमान धरणातील पाणीसाठा इतिहासातील नीचांकी पातळीवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
धरणात पुढील आठवडाभर पुरेल एवढेच पाणी शिल्लक असून, राजगुरूनगर शहराच्या पाणीपुरवठ्यावरही मर्यादा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तालुक्यातील भामा आसखेड आणि कळमोडी धरणांमधील पाणीसाठाही घटला असून,
जून महिन्याच्या पहिल्या-दुसर्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली नाही तर तालुक्यावर पाणीटंचाईचे मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या 23 तारखेपासून मान्सून सक्रिय झाला होता. मात्र, यंदा पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावलेली नसल्याने नागरिकांचे लक्ष आकाशाकडे लागून राहिले आहे.
दरम्यान, चासकमान धरणाखालील भीमा नदी पूर्णपणे कोरडी पडली असून नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारेही रिकामे आहेत. नदीत पाणी सोडल्यास प्रथम हे बंधारे भरावे लागतात, त्यानंतरच राजगुरूनगरच्या बंधार्यात पाणी पोहोचते. त्यामुळे कळमोडी धरणातून चासकमान धरणात पाणी सोडण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





