न्हावरे : शिरूर तालुक्यातील मोटेवाडी परिसरातील पाझर तलाव गेल्या 15 दिवसांपासून पूर्णपणे कोरडा पडल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना, दुसरीकडे चासकमान धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने शेती, जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि पाणी व्यवस्थापनातील नियोजनशून्यतेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोटेवाडी परिसरातील पाझर तलाव हा मोटेवाडी, दुर्गेवस्ती, चव्हाणवाडी, लंघेवाडी आणि करडे गावांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. या तलावाच्या माध्यमातून शेतीसाठी तसेच जनावरांसाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदा तलावात पाण्याचा एकही थेंब शिल्लक नसल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. चासकमानच्या पाण्याचे नियोजनबद्ध वितरण न झाल्याने अनेक भागांमध्ये पाणी पोहोचलेच नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासन आणि पाटबंधारे विभागातील समन्वयाच्या अभावाचा थेट फटका शेतकर्यांना बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे सुरू असताना तलाव कोरडा पडल्यामुळे शेतकर्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. अनेक शेतकर्यांनी हजारो रुपये खर्च करून मशागत केली आहे. मात्र पाण्याअभावी पेरणीचे नियोजन कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. काही ठिकाणी जनावरांसाठी टँकरने पाणी आणण्याची वेळ आली असून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का? चार महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी सर्वपक्षीय नेते मोटेवाडी, करडे, लंघेवाडी आणि चव्हाणवाडी परिसरात प्रचारासाठी फिरत होते. मात्र निवडणुका संपल्यानंतर तलाव कोरडा पडूनही लोकप्रतिनिधींनी शेतकर्यांकडे पाठ फिरवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. तलावात तातडीने पाणी सोडावे – संदीप येलभर मागील वर्षी मे महिन्यातच चांगला पाऊस झाल्यामुळे मोटेवाडीचा तलाव तुडुंब भरला होता आणि पाणीटंचाई जाणवली नव्हती. मात्र यंदा गेल्या 15 दिवसांपासून तलाव कोरडा पडला आहे. पाऊसही लांबण्याची चिन्हे दिसत असल्याने मोटेवाडीच्या तलावात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मोटेवाडीचे माजी सरपंच संदीप येलभर यांनी केली. सध्या गुनाट आणि निर्वी परिसरात चासकमानचे पाणी सुरू असून अंदाजे दोन ते तीन दिवसांत मोटेवाडी पाझर तलावात पाणी सोडण्यात येईल. मोटेवाडी येथील केवळ 50 टक्के शेतकर्यांनीच पाणीपट्टी भरली आहे. उर्वरित शेतकर्यांनी पाणीपट्टी न भरल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहेत. -अतुल गायकवाड, शाखा अधिकारी चासकमान हेही वाचा : Pune District : पाणीटंचाईवर समर्थ फाउंडेशनचा दिलासा; मोफत टँकर सेवेचा ग्रामस्थांना आधार