Pune District : शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा
Pune District : या प्रसंगी उपस्थितांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडू मातीच्या मूर्ती वापरण्याबाबत व जलप्रदूषण टाळण्याबाबत जागरूक करण्यात आले.

आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत शुक्रवारी (दि. ४) सिद्धबेट सभामंडप येथे शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिक, महिला बचत गट आणि शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेत प्रसिद्ध मूर्तिकार शरद लोहार यांनी लाल व शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवत विविध कलात्मक बाबींचे मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थी व नागरिकांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती तयार करून या उपक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या प्रसंगी उपस्थितांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडू मातीच्या मूर्ती वापरण्याबाबत व जलप्रदूषण टाळण्याबाबत जागरूक करण्यात आले.
पर्यावरणपूरक पद्धतीने सण-उत्सव साजरे करणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतो,असे प्रतिपादन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले. या कार्यक्रमास गटनेते सचिन गिलबिले, विरोधी पक्षनेते आदित्य घुंडरे, पूजा घुंडरे, आजी-माजी नगरसेवक आणि नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृत्रिम कुंडांतच विसर्जन करा
ज्या पद्धतीने आपण गणेशोत्सवामध्ये डीजे बंदीचा निर्णय घेत आहोत, त्याच पद्धतीने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पीओपीच्या मूर्तींचा वापर टाळून शाडूच्या मूर्तींचाच वापर करावा. तसेच गणेशमूर्तींचे विसर्जन इंद्रायणी नदीत न करता नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांमध्येच करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी केले.





