Pune District : चाकण नगरपरिषदेची अतिक्रमणाविरोधात मोहीम
Pune District : पुणे-नाशिक महामार्गावरील रुद्राक्ष हॉटेल ते शनी मंदिर परिसर, मुख्य बाजारपेठ, गणपती मंदिर परिसर तसेच शिवाजी विद्यालयासमोरील गर्दीच्या रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली.

चाकण : चाकण शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, पादचार्यांची गैरसोय आणि सार्वजनिक रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यासाठी चाकण नगर परिषदेकडून सोमवारी (दि. 23 जून) धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. पुणे-नाशिक महामार्गावरील रुद्राक्ष हॉटेल ते शनी मंदिर परिसर, मुख्य बाजारपेठ, गणपती मंदिर परिसर तसेच शिवाजी विद्यालयासमोरील गर्दीच्या रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली.
नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने रस्त्यांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणार्या फेरीवाले, हातगाडीधारक आणि सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणार्यांविरोधात कारवाई केली. या मोहिमेदरम्यान अनेक हातगाड्या, स्टॉल आणि व्यावसायिक साहित्य जप्त करण्यात आले. तसेच संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी दिली.
शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत, तसेच बाजारपेठेतील गर्दीच्या काळात वाहतूक विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. पादचार्यांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेत कारवाईचा बडगा उगारला.
कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाच्या पथकाने रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या हातगाड्या, अनधिकृत विक्री स्टॉल, फलक तसेच सार्वजनिक जागेचा अडथळा ठरणारे साहित्य हटविले. काही ठिकाणी व्यापार्यांना तातडीने अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. चाकण शहर झपाट्याने विस्तारत असून औद्योगिक क्षेत्रामुळे लोकसंख्या आणि वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे ही गंभीर समस्या बनत असून वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी कठोर उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर परिषदेने यापुढेही नियमितपणे अशा मोहिमा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव म्हणाले, सर्व व्यावसायिक, फेरीवाले आणि हातगाडीधारकांना आवाहन केले की, व्यवसाय करताना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. सार्वजनिक जागेचा अनधिकृत वापर टाळून शहराच्या सुव्यवस्थेला सहकार्य करावे. नियमांचे पालन केल्यास दंडात्मक कारवाई टाळता येऊ शकते. दरम्यान, नगर परिषदेच्या या धडक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून शहरातील प्रमुख रस्ते, चौक, शाळा परिसर आणि बाजारपेठ कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण मोहिमा राबविण्याची मागणी करण्यात येत आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि नागरिकांना सुरक्षित व मोकळे रस्ते उपलब्ध करून देणे ही नगर परिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई अपरिहार्य राहील.
-संतोष गायकवाड, नगर अभियंता तथा अतिक्रमण विभाग प्रमुख
अतिक्रमणविरोधी कारवाईतील प्रमुख ठिकाणे
रुद्राक्ष हॉटेल ते शनी मंदिर परिसर, पुणे-नाशिक महामार्गालगतची बाजारपेठ, शिवाजी विद्यालयासमोरील रस्ता, गणपती मंदिर परिसर, प्रमुख वाहतूक मार्ग व सार्वजनिक





