Nirmala Sitharaman AI Video Scam: सावधान! 21 हजार गुंतवा आणि 30 लाख मिळवा? अर्थमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य जाणून घ्या…
Nirmala Sitharaman AI Video Scam:

Nirmala Sitharaman AI Video Scam: डिजिटल युगात एखादी लिंक क्लिक करण्यापूर्वी दहावेळा विचार करणे आता काळाची गरज बनली आहे. सध्या सोशल मीडियावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या एका गुंतवणूक योजनेबद्दल सांगताना दिसत आहेत. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर थांबा! हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा नाही, तर तुम्हाला कंगाल करणारा एक मोठा ‘डिजिटल ट्रॅप’ आहे.
दावा काय आहे ?
सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या या दाव्यानुसार, एका विशिष्ट योजनेत फक्त २१,००० रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला तब्बल ३० लाख रुपयांचा नफा मिळेल. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः या योजनेचा प्रचार करत असल्याचा भास या व्हिडिओमध्ये निर्माण करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या आवाजाचा आणि चेहऱ्याचा वापर करण्यात आला आहे.
PIB फॅक्ट चेकने उघड केले सत्य –
व्हिडिओ व्हायरल होताच ‘पीआयबी फॅक्ट चेक’ (PIB Fact Check) टीमने याची पडताळणी केली. या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट (Fake) आहे. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डीपफेक (Deepfake) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
💰 Beware of Online Investment Scams❗
A link circulating on #WhatsApp directs users to a video falsely portraying Union Finance Minister Nirmala Sitharaman endorsing an investment platform. The video claims that an investment of ₹21,000 can generate returns of up to ₹30 lakh.… pic.twitter.com/cDgY5AneP9
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 7, 2026
अर्थमंत्र्यांचा मूळ व्हिडिओ मॉर्फ करून, मशीन लर्निंगच्या सहाय्याने त्यांचा आवाज आणि ओठांच्या हालचाली बदलण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार किंवा अर्थमंत्रालयाने अशा कोणत्याही अवास्तव नफा देणाऱ्या योजनेची घोषणा केलेली नाही.
सायबर गुन्हेगारांची ‘मोडस ऑपरेंडी’ –
सायबर चोरटे लोकांच्या विश्वासाला तडा देण्यासाठी आणि त्यांच्या मनात लालसा निर्माण करण्यासाठी बड्या नेत्यांच्या फोटोंचा किंवा व्हिडिओंचा वापर करतात. २१ हजारांचे थेट ३० लाख करणे कोणत्याही कायदेशीर वित्तीय संस्थेसाठी अशक्य आहे. तरीही, तांत्रिक कौशल्याचा वापर करून लोकांना जाळ्यात ओढले जाते.
दरम्यान, कोणतीही सरकारी योजना किंवा अधिकृत प्लॅटफॉर्म रात्रीतून पैसे दुप्पट-तिप्पट करण्याचे आश्वासन देत नाही.
फसवणूक झाली तर काय कराल?
जर तुम्ही अशा कोणत्याही फसवणुकीला बळी पडलात, तर वेळ न घालवता खालील पावले उचला.
हेल्पलाइन नंबर: तत्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर कॉल करा.
ऑनलाईन तक्रार: www.cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा.
बँकेला सूचना: तक्रार नोंदवल्यानंतर लगेच आपल्या बँकेला या प्रकाराची माहिती द्या, जेणेकरून तुमचे खाते सुरक्षित केले जाऊ शकेल.
महत्वाचे म्हणजे कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत सरकारी वेबसाइट्सवर जाऊन माहितीची शहानिशा नक्की करा.





