Stock Market: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी (१ फेब्रुवारी) सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाने शेअर बाजाराला मोठा हादरा दिला आहे. अर्थसंकल्पात सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) वाढवण्याच्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांमध्ये विक्रीची लाट उसळली. यामुळे रविवारी आयोजित विशेष सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ १५४६ अंकांनी, तर ‘निफ्टी’ ४९५ अंकांनी कोसळून बंद झाला. STT वाढीचा निर्णय ठरला ‘विलेन’ अर्थमंत्र्यांनी कमोडिटी फ्यूचर्सवर एसटीटी ०.०२ टक्क्यांवरून वाढवून ०.०५ टक्के केला आहे. तसेच ऑप्शन्स प्रीमियमवर तो ०.१ टक्क्यांवरून ०.१५ टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या निर्णयामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FII) मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची भीती निर्माण झाली, ज्याचा परिणाम थेट निर्देशांकावर दिसून आला. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) सकाळी ८२,३८८ अंकांवर उघडलेला सेन्सेक्स व्यवहारादरम्यान २,००० अंकांनी खाली आला होता. अखेर १.८८% (१५४६.८४ अंक) घसरून तो ८०,७२२.९४ वर स्थिरावला. तर एनसीई निफ्टी-५० (Nifty-50) मध्येही १.९६% (४९५.२० अंक) ची मोठी घसरण झाली. दिवसभरात २४,५७१ च्या नीचांकी स्तराला स्पर्श केल्यानंतर तो २४,८२५.४५ वर बंद झाला. बँकिंग आणि मेटल क्षेत्राला सर्वाधिक फटका – बाजारात सर्वाधिक पडझड बँकिंग क्षेत्रात पाहायला मिळाली. निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स ५.५७ टक्क्यांनी कोसळला. त्यापाठोपाठ मेटल (४.०५%), ऑईल अँड गॅस (२.८६%) आणि ऑटो क्षेत्रातही मोठी विक्री झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये अनुक्रमे २.२४% आणि २.७३% घसरण नोंदवण्यात आली. घसरण झालेले शेअर्स: एसबीआय (५.६१%), अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, रिलायन्स, एलअँडटी, मारुती, आणि आयटीसी. वाढलेले शेअर्स: घसरणीच्या बाजारात केवळ आयटी क्षेत्र सावरलेले दिसले. टीसीएस (२% वाढ), इन्फोसिस, सन फार्मा आणि टायटनचे शेअर्स हिरव्या निशाण्यावर बंद झाले. विकसित भारताचा संकल्प, पण बाजारात अस्वस्थता – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या भाषणात ७% विकास दराचा उल्लेख करत ‘विकसित भारत’ व्हिजनवर भर दिला. शेतकरी, महिला आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केले. मात्र, कररचनेतील बदलांमुळे तात्पुरती का होईना, पण बाजारात नकारात्मकता पसरली आहे. जागतिक संकेतही कमकुवत – भारतीय बाजारातील घसरणीला जागतिक परिस्थितीचीही जोड मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदासाठी केविन वार्श यांच्या नावाचे नामांकन केल्याने जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण आहे. तसेच चीनमधील सट्टेबाजीबाबतच्या इशाऱ्यामुळे आशियाई बाजारही शुक्रवारी घसरणीसह बंद झाले होते. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स काय असतो? (STT) हा एक प्रकारचा थेट कर (Direct Tax) आहे. जेव्हा तुम्ही शेअर बाजारात शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा फ्युचर्स आणि ऑप्शन्सची खरेदी किंवा विक्री करता, तेव्हा सरकारला हा कर द्यावा लागतो. अर्थसंकल्पात हा कर वाढवल्यामुळे आता व्यापार (Trading) करणे महाग होणार आहे.