बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करा; राज्यपाल हरिभाऊ बागडेंची मागणी

मुंबई : महिलांच्याबाबतीत घडणाऱ्या अशा घटना कमी करायच्या असतील तर मनातच भीती निर्माण करायला हवी. यासाठी महिलांची छेड काढणाऱ्यांना थेट चोप आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक केलं पाहिजे, असे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत, याप्रकरणी राज्यपाल बागडे यांनी हे वक्तव्य केले आहे.
बागडे म्हणाले की, काही लोक महिलांवर अत्याचार होत असतानाही व्हिडिओ बनवत असतात. जे योग्य नाही. आपल्या समोर अशी घटना होत असले तर त्याला पकडा. एकटे आहात म्हणून मागे हटू नका. समोर या आणखी 2-4 लोक मदतीला येतील. जोपर्यंत विनयभंग करणाऱ्याला आपण चोप देत नाही तोपर्यंत अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही.
नराधमांमध्ये धाक निर्माण करायचा असेल तर कायद्याच्या भीतीसाठी काय करावे, याचा आता तुम्हीच विचार करा. गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याने अशा घटना घडत आहेत. सध्या आपल्या देशात 12 वर्षांखालील मुलीवर लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग केला तर फाशीची तरतूद आहे. पण तरीही अशा घटना थांबत नाहीत, असेही ते म्हणाले.





