देवगड येथील ‘श्री गुरुदेव दत्त पिठास’ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची भेट !

नेवासा : तालुक्यातील तीर्थक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठास राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी (दि.१०) जानेवारी रोजी भेट दिली. आपल्या संस्कृतीवर अनेकांकडून प्रहार करण्याचे प्रयत्न झाले मात्र चिवट श्रध्दा व भक्तीतून साधूसतांनी धर्म व संस्कृती जपली म्हणून आज देशाची संस्कृती व परंपरा अबाधित आहे. ही संस्कृती व परंपरा जपा व तिला वाढविण्याचा प्रयत्न करा असे आवाहन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केले.
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे देवगड येथे आगमन झाल्यानंतर राष्ट्रीय संत गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज, प्रकाशानंदगिरीजी महाराज, सुनीलगिरीजी महाराज, गोपालानंदगिरीजी महाराज, ऋषिनाथ महाराज, विठ्ठलराव लंघे, दिनकर मते यांच्या समवेत उपस्थित मान्यवरांचे झांज पथकाच्या निनादात स्वागत केले.
यावेळी बोलतांना भास्करगिरी महाराज म्हणाले की, राज्यपाल झालेल्या बागडे यांनी जीवनात धर्म कार्यासह त्याग व समर्पित भावनेने राष्ट्राकरिता काम केले व करत आहे. त्यांच्या अंतकरणातील भाव हा राष्ट्राकरता व समाजाकरता असून मिळालेल्या सर्व पदांचा त्यांनी सन्मान केला. त्यांनी यावेळी बोलतांना त्यांनी देश सेवा व दुःख पीडितांची सेवा त्यांच्याकडून होत राहील असा शुभाशिर्वाद दिला.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की, आपली संस्कृती परंपरा धर्म संपविण्यासाठी व श्रध्दा नष्ट करण्यासाठी यापूर्वी अनेकांनी प्रयत्न केले मात्र साधू संतांनी अशाही परिस्थितीत आपल्या श्रद्धेने व चिवट भक्तीने धर्म टिकविण्याचे कार्य केले म्हणूनच आज आपण ही आज टिकलो आहे. असे स्पष्ट करून आज देवा धर्माचे काम भारत सरकार करत आहे आपल्या देशासह इतर देशात ही मंदिरे उभारली जात आहे, देशाच्या सरकारच्या खंबीर साथीचे हे चित्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
“पन्नास वर्षाच्या सेवाकार्याच्या सोहळयासाठी मी पुन्हा येईन” – हरिभाऊ बागडे
भास्करगिरी देवगड सेवा कार्याला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने तालुक्याच्या वतीने संत महंतांच्या उपस्थितीत गौरव सोहळा करण्याची माझी इच्छा असून त्यासाठी बाबांनी मला अनुमती द्यावी अशी विनंती आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी आपल्या भाषणातून केल्यानंतर हा सोहळा आपण जरूर करावा त्यासाठी मी पुन्हा येईन अशी ग्वाही बागडे यांनी यावेळी बोलतांना दिली.





